अनिकेत यादव, अहिल्यानगर : दारू पिऊन आईला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण, मुलांनाही सतत त्रास आणि त्यातच कर्जबाजारीपणावरून घरात सुरू असलेले वाद या कौटुंबिक कलहातून संतापलेल्या दोन मुलांनी आपल्या वडिलांचाच खून केल्याची धक्कादायक घटना वाकोडी शिवारात उघडकीस आली आहे. दिलीप करमदास भोसले (वय ४२, रा. वाकोडी) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी त्यांची दोन्ही मुले रोहित दिलीप भोसले (वय २१) आणि अंबर दिलीप भोसले (वय १९) यांना पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासातून या घटनेमागील कौटुंबिक वादाची माहिती समोर आली आहे.




नेमकी घटना काय? येथील पाण्याच्या टाकीजवळ शनिवारी (२४ ऑक्टोबर) रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास दिलीप भोसले यांना मारहाण करून ठार करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. सुरुवातीला अज्ञात व्यक्तींनी हा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवल्यानंतर या प्रकरणात मृत व्यक्तीच्या दोन्ही मुलांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झालं.







घरातील सततच्या वादातून टोकाचे पाऊलपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करत असल्याची माहिती तपासात समोर आली. तसेच ते आपल्या मुलांनाही त्रास देत असल्याचे पोलिसांनी सांगितले. कर्जबाजारीपणावरूनही घरात वारंवार वाद होत असल्याची माहिती पुढे आली आहे. या सततच्या कौटुंबिक तणावातून दोन्ही मुलांच्या मनात संताप निर्माण झाला आणि त्यातूनच त्यांनी वडिलांचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घरातील वाद विकोपाला गेल्यानंतर वडिलांच्या हत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याचे या प्रकरणाच्या तपासातून समोर आले आहे. नेमकी घटना कशी घडली? खुनासाठी कोणत्या वस्तूचा वापर करण्यात आला? आणि हत्येपूर्वी काय घडले? याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.




स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाला यशघटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी स्वतंत्र पथक तयार केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्यासह पोलीस अंमलदार अतुल लोटके, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड आणि भगवान धुळे या पथकात सहभागी होते. पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती संकलित केली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाला दिशा देण्यात आली. तपासादरम्यान मृत दिलीप भोसले यांच्या मुलांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीनंतर रोहित आणि अंबर भोसले यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.







पितृहत्येच्या घटनेने परिसरात खळबळवडिलांकडून आईला होणारी मारहाण, मुलांना दिला जाणारा त्रास आणि कर्जबाजारीपणातून निर्माण झालेला कौटुंबिक तणाव या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने वाकोडी परिसरात खळबळ उडाली आहे. घरातील वाद मिटण्याऐवजी त्याचे रूपांतर थेट हत्येत झाल्याने या घटनेची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.




Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.