पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे (Pune Teachers constituency election) उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी आहे. कौस्तुभ गावडे हे पहिल्या क्रमांकावर असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिलेले सचिन सानप हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेले दत्तात्रय सावंत हे बाद झाले आहेत. कौस्तुभ गावडे आणि सचिन सानप यांच्या मतांमध्ये 6,200 मतांचा फरक आहे. सानप यांच्या मतांची मोजणी सुरू आहे.(Pune Teachers constituency election) तर या निकालांची स्पष्टता समोर येताच शिवसेनेचे उमेदवार सचिन सानप यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. तर विजयी उमेदवार होणाऱ्या कौस्तुभ गावडे यांचं सचिन सानप यांनी अभिनंदन केलं आहे. मुख्य लढत ही भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे आणि माझ्यात होती, त्यामुळे मतांच्या विभागणीचा प्रश्नच येत नाही अशी प्रतिक्रिया सचिन सानप यांनी दिली आहे.पैसे वाटपांच्या आरोपावर बोलताना सचिन सानप म्हणाले, शिक्षकांना बदनाम करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, एक खंत मनात आहे की शिक्षकांनी शिक्षक आमदार निवडला नाही. कौस्तुभ गावडे यांच्या विजयाची घोषणा काही वेळात होईल. पण आम्ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी काम करतच राहू
पुढे बोलताना सानप म्हणाले, प्रत्यक्ष आकडे बाहेर यायचे आहेत, पण १७ हजारांपेक्षा जास्त मतदान या निवडणुकीमध्ये मला माझ्या शिक्षक बंधुभगिनींनी मला दिलं, मोठा मतदारसंघ होता. पाच जिल्हे होते, 58 तालुके होते, आणि सर्व शिक्षकांनी विश्वास दाखवला, कालावधी कमी मिळाला पण तरीदेखील त्यांनी विश्वास दाखवला, सर्व प्रयत्न केले, दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभुराजे देसाई, प्रकाश आबिटकर, शिवसेना पक्ष आणि आमदार, खासदार, शिवसेनेचे पदाधिकारी यांनी मोठी ताकद माझ्यामागे उभी केली, या सर्वांमुळे मोठी मजल मारू शकलो, त्यांचे मी आभार व्यक्त करतो, कौस्तुभ गावडे निवडून येत आहेत असं निकालावरून दिसून येतंय, थोड्या वेळात निकाल जाहीर केला जाईल. त्यांना मी शुभेच्छा देतो, खेळीमेळीमध्ये या निवडणुकीला आम्ही सामोरे गेलो, आम्ही नवखे होतो, पण पाहिला चांगला प्रयत्न केला, थोडं कमी पडलो, पण आमचं कार्य, शिक्षकांचे प्रश्न पुढेही मांडत राहू असंही पुढे सचिन सानप यांनी म्हटलं आहे.
तांत्रिक गोष्टी त्याच्यामध्ये अनेक असू शकतात, परंतु मला जे काही एकनाथ शिंदे आणि पक्षाने ऐनवेळेला म्हणजे जो काही सपोर्ट दिलेला आहे ना तो माझ्यासाठी साठी खूप महत्त्वाचा होता, तो आशीर्वादरूपी होता. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे आणि सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. बाकी जी काही उणीव राहिली असेल ती उणीव माझी वैयक्तिक उणीव आहे, असं मी समजतो. सर्व कार्यकर्ते, आमचे सर्व शिक्षक, सहकारी जे आहेत, त्यांनी खूप मनापासून प्रयत्न केले. मी शिंदे साहेब आणि विशेष म्हणजे उदय सामंत यांचे विशेष ऋण व्यक्त करू इच्छितो. किरण सामंत, शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर, दादासाहेब भुसे साहेब यांनी खूप चांगल्या पद्धतीने माझ्या पाठीशी आशीर्वाद उभे करण्याचा प्रयत्न केला, या सर्वांच्या मी ऋणात राहू इच्छितो, त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन पुढच्या काळातही माझ्या सोबत असेल. जो काही कौल होता, तो कौल आपण स्वीकारला पाहिजे, त्याला काय कारणं आहेत, काय नाहीत, कशा शक्ती आहेत कशा पद्धतीने त्या कार्यरत होत्या, हे सगळं आपण आपल्याला ज्ञात आहे, परंतु त्यात आपण बोलणं उचित नाही, निवडून आलेल्या उमेदवाराचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आमचा जो काही शिक्षकांसाठीचा लढा आहे तो या पुढच्या काळामध्ये अधिक ताकतीने सुरू राहील, असंही सचिन सानप म्हणालेत.
तर शिक्षकांना पैसे वाटपाच्या आणि पैसे घेतल्याच्या आरोपवर उत्तर देताना सानप म्हणाले, मी खरं सांगू का की असं कोणी शिक्षकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, हा लढा आमचा स्वाभिमानाचा होता, हा लढा आमच्या शिक्षकांच्या सन्मानाचा होता, पुढच्या काळातही आम्ही हा स्वाभिमानासाठी आणि सन्मानासाठी नक्कीच प्रयत्न करत राहू, ज्यांनी कोणी अशा पद्धतीने दबावतंत्र वापरलेत किंवा आमिष दाखवलीत कदाचित निवडणुकांमधील यश आज दिसत असेल, परंतु लोकांच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढच्या काळामध्ये चांगल्या माध्यमातून परिवर्तनाच्या माध्यमातून चळवळीच्या माध्यमातून आम्ही पुढे घेऊन जाऊ.
ही लढत थेट मी आधीपासून सांगत होतो की कौस्तुभ गावडे आणि मी, आमच्यामध्ये असणार आहे, तशीच झालेली आहे, आम्ही देखील विजयाच्या उंबरठ्यावर होतो, जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो, काही उणिवा आमच्या कदाचित राहिल्या असतील, काही सेगमेंट्स पर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न कमी पडला असेल, आम्ही तो नक्कीच पुढच्या काळामध्ये सुधारू, ही खंत मात्र नक्की मनात राहील की शिक्षकांचा आमदार शिक्षक व्हावा यासाठी आम्ही जो लढा उभा केलेला होता, तो लढा कुठेतरी कमी पडला, पण नक्कीच शिक्षकांना सुद्धा जाग येईल आणि शिक्षकांच्या या लढ्यामध्ये ते पुढच्या काळामध्ये नक्की सामील होतील, असा विश्वासही सानपांनी व्यक्त केला आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.