नागपूर : नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपचे सुधाकर कोहळे आणि अभिजित वंजारी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत कोहळे यांनी आघाडी घेतलीही होती, मात्र दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत निकालाचे चित्र बदलले. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना मिळालेल्या मतांनी शेवटच्या क्षणी गणित बदलले. त्यानंतर ‘जो जीता वो सिकंदर’ आणि मी जिंकलेलो आहे, अशा शब्दांत वंजारी यांनी आपल्या विजयाचा आनंद व्यक्त केला.
पदवीधर मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत भाजपच्या सुधाकर कोहळे यांना ६० हजार ९२४, तर अभिजित वंजारी यांना ५६ हजार ६३० मते मिळाली होती. त्यामुळे कोहळे यांनी ४ हजार २९४ मतांची आघाडी घेतली होती. मात्र, या निवडणुकीत पहिल्या पसंतीची मते निर्णायक ठरली नाहीत. अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना सुमारे २४ हजार मते मिळाल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नियमानुसार पुढील मतमोजणीत दुसऱ्या पसंतीच्या मतांचा विचार करण्यात आला आणि त्यानंतर निकालाचे गणितच बदलले.
नितेश कराळे फॅक्टरची चर्चाया निवडणुकीत नितेश कराळे यांना मिळालेल्या मतांचा निकालावर कसा परिणाम झाला, याची चर्चा सुरु झाली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडीवर असलेल्या सुधाकर कोहळे यांना दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत विजय कायम राखता आला नाही. अभिजीत वंजारी यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे आघाडी मिळवत विजय नोंदवला. त्यामुळे या निवडणुकीत कराळे फॅक्टर महत्त्वाचा ठरला आहे.
‘जो जीता वो सिकंदर’ आणि स्ट्रॅटेजीचा विजयविजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की माझा विजय निश्चित आहे. मला जरी कमी आघाडी मिळाली असली, तरी मागील सहा वर्षांपासून मी माझ्या मतदारसंघात जे काम केले, त्या कामाची पावती म्हणजे हा विजय आहे. 'जो जीता वो सिकंदर आणि मी जिंकलो आहे'. पदवीधरांचे अनेक प्रश्न आहेत. देशपातळीवरील मुद्देही आहेत. भाजपच्या राजकारणाच्या विरोधात लोकांनी दिलेले हे मताधिक्य आहे."
कराळे लहान भाऊ, दुसऱ्या पसंतीची मते स्ट्रॅटेजीचा भागनितेश कराळे यांच्याबद्दल बोलताना वंजारी म्हणाले, "नितेश कराळे हा आमचा लहान भाऊ आहे, आमचा मित्र आहे. त्याला मिळालेली मते कोणाचीही असली, तरी विजय मात्र आमचा झाला आहे. नितेश कराळे यांची दुसऱ्या पसंतीची मते मला मिळाली आहेत. हा आमच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे. मी पहिल्यापासून सांगत होतो की, ही प्रचारापेक्षा स्ट्रॅटेजीची निवडणूक आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, ही म्हण आज खरी ठरली" असेही वंजारी म्हणाले.
दरम्यान, या निवडणुकीत भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांनी नागपुरात येऊन प्रचार केला. उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पक्षाने संपूर्ण ताकद लावली. मात्र, मतदारांचा पाठिंबा आम्हाला मिळाला, मतदार आमच्यासोबत होते, महाविकास आघाडीचे नेते, संघटना आणि कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे होते. हा विजय संघटना आणि कार्यकर्त्यांचा आहे, असेही अभिजीत वंजारी म्हणाले.