मुंबई : मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना यंदा ३३ हजार रुपये बोनस जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी ३१ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यंदाच्या बोनसमुळे मुंबई महापालिकेवर सुमारे ३०० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. सामाजिक आरोग्य स्वयंसेविका, बालवाडी शिक्षिका, मदतनीस यांना भाऊबीज भेट देण्यात येणार आहे.
बोनसबाबतची घोषणा महापौर रितू तावडे यांनी बुधवारी केली. यासंदर्भात झालेल्या बैठकीत महापालिका मुख्यालयात उपमहापौर, विरोधी पक्षनेत्या, विविध पक्षांचे गटनेते आणि कामगार, कर्मचारी संघटना उपस्थित होते. मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचारी, अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, महापालिका प्राथमिक शाळांतील, तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षण सेवक, माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित आणि विनाअनुदानित), माध्यमिक शाळांतील शिक्षण सेवक, अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते आणि शिक्षकेतर कर्मचारी, अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक यांना ३३ हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
महापालिकेचे एकूण ९३ हजार ५०९ अधिकारी, कर्मचारी, सामाजिक आरोग्य स्वयंसेविका, बालवाडी शिक्षिका, मदतनीस आहेत. सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना १४ हजार रुपये आणि बालवाडी शिक्षिका , मदतनीस यांना सात हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. बालवाडी शिक्षिका, मदतनीस यांच्या भाऊबीज भेटीत दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राज्यात यंदा कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील या परिस्थितीचा सारासार विचार करून आणि महापालिका संघटनांशी चर्चा करून ३३ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. बोनसमुळे सन २०२३मध्ये २३० कोटी आणि सन २०२४मध्ये २५२ कोटी रुपये भार पडला होता.
आशा सेविकांना बोनस नाही मुंबई महापालिकेच्या आशा सेविका व स्वच्छता मुंबई प्रबोधन मोहिमेतील सफाई कामगारांना १५ हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे याविरोधात महापालिका संघटना औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.