भविष्यातील पाणीबाणीचे संकट ओळखून ठाणे महापालिकेने आतापासूनच कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. ठाणे शहरात दहा टक्के पाणी कपात जाहीर केले असून आता पाणीटंचाईमुळे उद्यापासून गाड्या धुण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाने नोटिसा बजावत ठाण्यातील वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या ड्राय डेमुळे वाहनचालकांना स्वतःच आपल्या गाड्यांची धूळ झटकावी लागणार आहे.
यंदा पावसाने पाठ दाखवल्यामुळे धरण क्षेत्रात अत्यंत कमी जलसाठा आहे. या जलसाठ्याचे नियोजन करण्याची पालिकेने आतापासून सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने तसेच इतर वाहनांच्या धुण्याच्या कामावर पालिकेने कडक निर्बंध घातले आहेत. पिण्याचे पाणी, बोअरवेलचे पाणी आणि विहिरीचे पाणी वापरण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच वाहन धुण्यासाठी प्रेशर जेटचाही वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ठाण्यातील वॉशिंग सेंटर्सचे धाबे दणाणले आहेत.
आदेशांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई
पालिकेच्या आदेशांचे उल्लंघन झाल्यास सर्व्हिस स्टेशनवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पाणीपुरवठा विभागाने दिला आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा पुरेपूर वापर करता यावा, यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे तसेच पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.