मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक होत नसेल तर या राज्याला हतबल आणि दुर्बल गृहमंत्री लाभलेला आहे, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष आणि चिन्ह चोरून एका दरोडेखोरांच्या हाती दिले ते देवेंद्र फडणवीस यांच्या मनाला खातंय, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मीनाक्षी शिंदे यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पूर्णेकर यांच्या हत्येचा कट रचण्यामध्ये मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचा सहभाग आहे. हत्येच्या तासाभरापूर्वी सर्व आरोपी एकत्र बसले होते, त्यात राजेंद्र शिंदे आणि मुख्य सुत्रधार मीनाक्षी शिंदे आहेत. मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या नवऱ्यालाच सुपारी दिली होती. आणि नवऱ्याने खाली सुपारी दिली होती. हे सगळ्या अशा प्रकारे कारस्थान झालं होतं. ही बाब ठाण्याच्या पोलिसांना, SIT ला, एकनाथ शिंदे यांना सगळ्यांना माहित आहे. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदेच मुख्य आरोपी आहेत हे आयुक्तांनाही माहित आहे, तरीही जर त्यांना अटक होत नसेल तर या राज्याला हतबल आणि दुर्बल गृहमंत्री लाभलेला आहे. आणि या प्रकरणात पोलीस आयुक्तांचा आणि गृहमंत्र्यांचा बळी जाणार आहे. आता विधीमंडळाचे आणि संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. जनतेचा प्रचंड दबाव आहे. एका निष्पाप राजकीय कार्यकर्त्याची हत्या ठाण्यात झालेली आहे. ती हत्या दडपण्यासाठी आणि खुन्यांना वाचवण्य़ासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री करत आहेत. ज्यांनी आमचा विरोध केला त्यांना लाज वाटली पाहिजे. मुख्य आरोपींच्या अटकेसाठी त्यांनी आमच्यासोबत सहभागी व्हायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एवढी अमानुष नव्हती. ही डुप्लिकेट शिवसेना आहे. म्हणूनच ज्यांची हत्या झाली आहे, त्यांच्या कुटुंबीयांचे दुःख त्यांना कळणार नाही. पुर्णेकरांचा मुलगा एकटाच सत्य काय आहे हे सांगण्यासाठी पालकमंत्र्यांच्या घरी निवेदन द्यायला जात होता, त्याला पोलिसांनी उचलून फरपटत रिक्षात कोंबलं कुणासाठी? ज्याने आपला बाप गमावला, जिने आपला पती गमावला त्यांच्याशी सरकार अशा प्रकारे वागतंय? त्यामुळे भविष्यात पुर्णेकर प्रकरण राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि ठाण्याच्या पालकमंत्र्यांना महाग पडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
पूर्णेकर प्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव आहे. ठाण्यात काल आम्ही आदित्य ठाकरे यांच्यासोबत गेलो होतो. आमच्यासोबत मनसेचेही नेते होते, हे सर्वपक्षीय आंदोलन असून हे सरकारला किंवा आयुक्तांना कळत नाही का ? आयुक्त हे अत्यंत चांगले गृहस्थ आहेत पण ते दबावाखाली आहेत. काल आम्ही ठाण्यात आलो आणि गेलो. ठाण्यात आम्ही काय लग्नाच्या वरातीत नाचायला गेलो नव्हतो. पुर्णेकरांच्या हत्येतील आरोपींना अटक करा या मागणीसाठी आम्ही ठाण्यात गेलो होतो. त्या आरोपींना राजकीय आश्रय लाभल्याने त्यांना अटक होत नाहिये, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
राजकीय मार्ग जरी बदलले तरी विचार एक असतात. भाजपच्या ज्या ऐऱ्यागैऱ्यांसोबत बसलेले आहेत ते काही खरे शिवसैनिक नाहीत. तुम्ही ज्या पद्धतीने शिवसेनेचे तुकडे केलेत, ज्या पद्धतीने तुम्ही शिवसेना पक्ष आणि चिन्ह चोरून एका दरोडेखोरांच्या हाती दिले ते देवेंद्र फडणवीस यांच्या मनाला खातंय, असेही संजय राऊत म्हणाले .
एप्रिल – मे महिन्यानंतर देशात आणि राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दिल्लीत घडामोडी घडतील आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रात पडणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे जे म्हणत आहेत ते बरोबर बोलत आहेत, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
दक्षिणेत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या रक्ताला चटावलेले लोक असतात. महाराष्ट्राची तशी संस्कृती नाही. महाराष्ट्रात फार फार विरोधकांना खोट्या गुन्ह्याखाली तुरुंगात टाकलं जातं. किंवा फारतर पुर्णेकरांच्या हत्येचा तपास होऊ देत नाहीत. पण यशवंतराव चव्हाणांपासून ते बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत महाराष्ट्राची ही फार मोठी परंपरा आहे. आमचे जे विरोधी आहेत, सत्तेतले असतील किंवा विरोधातले असतील ते काही आमचे वैयक्तिक शत्रू नाही, ही आमची वैचारिक लढाई आहे. निवडणुकीत जे असेल ते आम्ही करू, पण एरवी आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आहोत, असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्र लुटणाऱ्या शहाचा उदो उदो करणारे किंवा शहाची बुट चाटेगिरी करणारे हा काय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आहे का? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. ज्या पद्धतीने अमित शहा आणि त्यांची लोकं महाराष्ट्र आणि मुंबई लूटत आहेत, मराठी माणसाच्या विरोधात भूमिका घेत आहेत, कदाचित ते मुंबई वेगळी करण्याची योजना आखत आहेत, हा काय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आहे का? हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे द्रोही आहेत. आणि अशा विचारांचे महाराष्ट्रद्रोही जर फडणवीसांच्या सरकारमध्ये असतील तर आम्ही दूर आहोत ते बरे आहोत. अमित शहा यांनी महाराष्ट्राचा विचार केला असता तर त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह ऐऱ्यागैऱ्याच्या हाती दिलं नसतं, असेही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.