पुणे : पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या सारसबाग परिसरातील दादावाडी जैन मंदिराबाहेर उभ्या असलेल्या एका बेवारस कारमध्ये काल (शुक्रवारी, 30 ऑक्टोबर) सकाळी पावणे 10 च्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह (Pune Crime News) आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा तरूण तो गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता होता. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार आधीच दाखल करण्यात आली होती.(Pune Crime News)
शुक्रवारी सकाळी दादावाडी जैन मंदिरासमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या एका चारचाकी कारमधून अचानक तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ही कार गेल्या 2 ते 3 दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडून पाहिले असता, आतील सीटवर तरुणाचा फुगलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक विभागाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. तर शुभरत बाळासाहेब बनसोडे (वय 25, रा. कवडी गाव, लोणी काळभोर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभरत हा 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास आपल्या रिक्षाचालक वडिलांचा जेवणाचा डबा देण्यासाठी हडपसर गाडीतळावर गेला होता. त्यानंतर त्यांना घरी जातो असं सांगून तिथून निघून गेला, रात्री साडे 9 च्या सुमारास त्याने मित्राला भेटून 'मी चाललो' असे सांगितले आणि त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेऊन 28 ऑक्टोबर 2026 रोजी हडपसर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती.
पोलीस तपासात ही कार त्याचा मित्र अविनाश परशुराम गायकवाड यांची असल्याचे निष्पन्न झाले आहे. शुभरत हा त्यांच्याकडून कार घेऊन गेला होता. मात्र, हडपसर येथून कार घेऊन तो कुठे गेला? सारसबाग परिसरात ही कार कधी आणून उभी केली? त्याच्यासोबत आणखी कोणी होते का? आणि त्याचा मृत्यू नेमका कसा झाला? या सर्व प्रश्नांचा शोध आता पोलीस घेत आहेत. मृतदेहावर कोणत्याही प्रथमदर्शनी जखमा दिसून आलेल्या नाहीत. त्यामुळे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.