लातूर : शहरातील (Latur) उमाटे कुरिअर सर्व्हिसमध्ये सामानाची चढ-उतार सुरू असताना स्फोट (Blast) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे, या पार्सलमध्ये नेमकं काय होतं? स्फोट होण्यामागचं कारण काय, याचा तपास लातूर पोलिसांकडून (Police) सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे कुरिअर शॉपचे मालकही आश्चर्यचकीत झाले आहेत. कारण, दैनदिन रुटीनप्रमाणे काम सुरू असताना, अचानक स्फोट झाल्यामुळे संबंधित पार्सल कुठून आले आणि त्यात काय होते याचा तपास सुरू आहे. मात्र, आमच्याकडे येणाऱ्या पार्सलमधील सामानाची माहिती आमच्याकडे नसते, तर आमच्याकडून जाणाऱ्या पार्सलमधील साहित्याची माहिती आमच्याकडे असते, असेही कुरिअरच्या मालकांनी सांगितले.
लातूर शहरातील उद्योग भवन परिसरात असलेल्या उमाटे कुरिअर सर्व्हिसमध्ये आलेल्या पार्सलचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की काही काळ नेमकं काय घडलं, हे कोणालाही समजलं नाही. या घटनेत पार्सल उतरवणारा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे .कुरिअरच्या वाहनाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. स्फोटामुळे वाहनाचे छत आणि काचा निखळून पडल्या आहेत. नेहमीप्रमाणे कुरिअरमधील सामानाची चढ-उतार सुरू असताना अचानक एका पार्सलचा स्फोट झाला. जखमी कर्मचाऱ्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिसांचे पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, संबंधित पार्सल कोणी पाठवलं होतं, त्यामध्ये नेमकं कोणतं साहित्य होतं आणि स्फोट कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दररोजप्रमाणे सामानाची चढ-उतार सुरू असतानाच अचानक स्फोट झाला. यात एक जण गंभीर जखमी झाला असून, पार्सलमधील साहित्य आणि ते पाठवणाऱ्याची माहिती घेत असल्याचं उमाटे कुरिअरच्या संचालकांनी सांगितलं आहे. या भीषण स्फोटामागचं नेमकं कारण शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.