पुणे : पुण्यातील 'द पूना मर्चेंट्स चेंबर'च्या लाडू-चिवडा विक्रीला आजपासून सुरुवात झाली असून, अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चेंबरच्या या सामाजिक उपक्रमाचे यंदा 39 वे वर्ष आहे. यंदा लाडू आणि चिवडा प्रत्येकी एक किलोसाठी 230 रुपये, तर अर्धा किलोसाठी 120 रुपये दर असणार आहे. पुण्यासह राज्यात आणि परदेशात फराळ पोस्ट पाठविण्यासाठी विभागाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी मार्केट यार्ड येथील चेंबरच्या कार्यालयात स्वतंत्र काउंटर सुरू करण्यात येणार आहे. कच्च्या मालाचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत, तसेच गॅसचे दर आणि कामगारांची मजुरीही वाढल्याने गेल्या वर्षी किलोमागे 190 रुपये असलेला दर यंदा वाढून 230 रुपये झाला आहे. दरम्यान, या विक्रीचे उद्घाटन करण्यापूर्वी एफडीए कडून या सगळ्या पदार्थांचे नमुने (सॅम्पल्स) घेण्यात आले होते. खाजगी लॅबच्या लोकांकडून आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून हे अन्नपदार्थ बनवताना गुणवत्तेविषयीच्या सर्व प्रक्रिया पार पडत आहेत का, हे तपासले जात असून या उद्घाटनानंतर कार्यक्रमानंतर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, आज या ठिकाणी उद्घाटनासाठी मला बोलावलं याचा आनंद आहे. जेव्हा पुना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष माझ्याकडे आले होते, तेव्हा मी त्यांना विचारणा केली होती. हा एक अत्यंत चांगला आणि उत्कृष्ट उपक्रम असून, याद्वारे अनेक गरजू लोकांना चांगल्या दर्जाचा, सुरक्षित (सेफ) आणि स्टँडर्ड दिवाळीचा फराळ म्हणजेच लाडू व चिवडा माफक किमतीत मिळतो. हा उपक्रम 'नो प्रॉफिट, नो लॉस' तत्त्वावर वर्षानुवर्षे सुरू आहे. यामध्ये ते जवळजवळ 2 लाख किलो फराळ तयार करतात आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात व ठिकाणी त्याची विक्री करतात, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. यावर्षी विशेष करून आम्ही त्यांना काही सूचना केल्या होत्या आणि त्यांनी त्या सूचनांचे तंतोतंत पालन केले आहे, हे कौतुकास्पद आहे. त्यांनी सर्वांची वैद्यकीय तपासणी (Medical Check-up) व्यवस्थित करून घेतली असून, 2 हजार फूड हँडलर्सचे ट्रेनिंग घेतले आहे. तसेच, पूर्वी न केला गेलेला 'टेक्निकल सुपरवायझर' चा नियम यावेळी पाळण्यात आला आहे; म्हणजेच प्रत्येक 25 ते 30 लोकांच्या पाठीमागे एक टेक्निकल सुपरवायझर असावा, जेणेकरून उत्पादित होणारा लाडू किंवा चिवडा हा पूर्णपणे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स प्रमाणे तयार होईल, ही अट त्यांनी पाळली आहे.
फराळातील रंगाबाबत बोलताना ते म्हणाले की, रंगाचे प्रमाण कमी करण्यात आले असून मी त्यांना सूचना दिली आहे की, सध्या जे नैसर्गिक (नॅचरल) रंगांचे प्रमाण आहे, त्याशिवाय कोणतीही ॲडिड किंवा आर्टिफिशियल रंग वापरू नका. नियमानुसार अनुमती असलेल्या स्वीट्समध्ये 100 ppm पर्यंत रंग चालतो, आमच्या लॅब टेस्टमध्ये सर्व प्रॉडक्ट्सचे पॅरामीटर्स पास झाले असून त्यांनी क्लेम केल्याप्रमाणेच ते आहेत. सध्या यात केवळ 30 ppm पर्यंतच रंग आहे, जो 100 ppm च्या मर्यादेत आहे. तरीही माझी त्यांना सूचना आहे की, आर्टिफिशियल रंग अजिबात न ठेवता फक्त नॅचरल कलरच ठेवावा. हा उपक्रम नागरिक आणि व्यवसायासाठी फायद्याचा असून एक फिलाँथ्रोपिक ॲक्टिव्हिटी म्हणून खूप चांगली गोष्ट आहे. तसेच, 1988 मध्ये हा कार्यक्रम सुरू केला तेव्हाचे तत्कालीन जिल्हाधिकारी पाटील साहेब आज इथे उपस्थित आहेत, ज्यांनी नंतर महामुंबई कमिशनर म्हणूनही काम केले आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो.
पदार्थांच्या गुणवत्तेबाबत पुढे बोलताना मुंढे म्हणाले की, बेसिकली यामध्ये तेल आणि तूप किती वापरले जाते, यावरून सबस्टँडर्ड किंवा अनसेफ तेलाचा वास येऊ शकतो, ही तपासण्याची एक टेकनिक आहे. मी स्वतः लाडू क्रश करून पाहिले असता, माझ्या हाताला कोणताही रंग लागलेला नाही, म्हणजेच रंगाचे प्रमाण अगदी नगण्य आहे आणि तेलही जास्त जाणवले नाही. आमची लॅब टेस्ट आधीच झाली असून त्याचे रिपोर्ट आहेत आणि लॅबमध्ये सर्व परफेक्ट होते, तरीही मी खात्री करण्यासाठी पुन्हा तपासले की, खरोखर निकषांनुसार वापरले आहे का, की केवळ लॅब टेस्टपुरताच दिखावा आहे. तसेच, समोर उघड्यावर ठेवलेल्या लाडूंच्या डेकोरेशनबाबत मी विचारले, कारण जो पदार्थ उघड्यावर ठेवला जातो आणि खाण्यायोग्य राहत नाही, तो पूर्वी गाईला दिला जायचा; मात्र माझी त्यांना सूचना आहे की गाईला न देता त्याचे नियमानुसार योग्य डिस्पोजल करावे आणि त्यांनी त्याप्रमाणे केले आहे.
सध्याच्या कारवाईबाबत माहिती तुकाराम मुंढे म्हणाले की, गेल्या दोन दिवसांत म्हणजेच प्रामुख्याने गुरुवार आणि शुक्रवारी मी दोन मोठ्या कारवाईची माहिती दिली आहे; एक मसाल्यांच्या (Spices) बाबतीत आणि दुसरी खाद्यतेलाच्या (Edible Oil) बाबतीत. मसाल्यांच्या आणि तेलाच्या बाबतीत प्रत्येकी 1 हजार पेक्षा जास्त ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये सुमारे 28,000 क्विंटल खाद्यतेलाचा साठा आपण जप्त केला असून, मसाले सुमारे 18 ते 20 हजार क्विंटलच्या आसपास जप्त केले आहेत. मसाल्यांच्या आणि खाद्यतेलाच्या बाबतीत महाराष्ट्रातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. ही कारवाई आपण दिवाळीच्या सणाच्या अनुषंगाने केली असून, यावेळेस फेस्टिव्हलच्या बाबतीत आपण केवळ एका सणापुरती मर्यादित न राहता वर्षभरासाठी आणि सर्व सणांसाठी चालणारी 'स्टँडिंग ऑर्डर' काढली आहे.
कारवाईच्या पद्धतीबाबत तुकाराम मुंढे म्हणाले की, आपण सणाच्या 21 दिवस अगोदर आणि सण झाल्यानंतर 30 दिवस अशा 4 फेजेसमध्ये ही मोहीम राबवत आहोत. पहिला टप्पा हा सणाच्या 21 दिवस आधी सुरू झाला होता, ज्यामध्ये प्रामुख्याने मॅन्युफॅक्चरर, वेअरहाऊस, डीलर्स आणि सेमी-डीलर्सवर कारवाई केली जाते, जेणेकरून अनसेफ किंवा सबस्टँडर्ड रॉ मटेरियल मार्केटमध्ये येणार नाही. दुसरा टप्पा आता रिटेलमध्ये लाडू आणि फराळाच्या विक्रीच्या वेळी सुरू होत आहे, कारण आठ-पंधरा दिवस आधीच फराळ तयार होतो आणि त्यानुसार आता कारवाई आधीपासूनच सुरू आहे. ड्रायफ्रूट्सच्या कारवाईबाबत बोलताना ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी दिलेल्या प्रेस नोटमध्ये नवी मुंबईतील एका ड्रायफ्रूटच्या वेअरहाऊसवर आपण मोठे क्रॅकडाऊन केले होते, जिथून मुंबई आणि पुणे भागात मोठा पुरवठा होत होता. तिथे नॉन-कम्प्लायन्सेस आढळल्यामुळे आपण तो वेअरहाऊस सील आणि सस्पेंड करून पुढील कारवाई केली आहे. ड्रायफ्रूट, स्वीट शॉप, मिल्क प्रॉडक्ट्स, ऑइल, स्पायसेस किंवा आता दिवाळीनिमित्त तयार होणारे सर्व प्रॉडक्ट्स यावर आपली तपासणी आणि टेस्टिंग सतत चालू आहे.
नागरिकांना आणि व्यवसायिकांना आवाहन करताना तुकाराम मुंढे म्हणाले की, जर कोणालाही काही डाऊट असेल, तर त्यांनी आमच्या FDA पोर्टलवर तक्रार करावी, आम्ही त्यावर तात्काळ कारवाई करू; त्यामुळे कोणीही भीती बाळगण्याचे कारण नाही. माझी व्यवसायिक समुदायाला एवढीच विनंती आहे की, फूड सेफ्टीचे जे नियम आणि रेग्युलेशन दिले आहेत तसेच एफडीएने फेस्टिव्हल आणि अन्नपदार्थांच्या बाबतीत ज्या कंप्लायन्स ऑर्डर्स काढल्या आहेत, त्याचे तंतोतंत पालन करा. असे केल्यास तुमचा व्यवसायही चांगला चालेल, नागरिकांना कोणताही आजार होणार नाही, सुरक्षित, साऊंड आणि स्टँडर्ड अन्न मिळेल आणि आपण सर्वजण मिळून आनंदाने हा फेस्टिव्ह सीजन साजरा करू शकू, अशी माझी अपेक्षा आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.