प्रयागराज: नवाबगंज परिसरातील बरायपूर रामनगर गावातील दोन भावंडांच्या घरात पुरलेल्या ३ निळ्या ड्रममधून पोलिसांनी तब्बल ३.२ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणात चार दिवसांनी आता तपास यंत्रणांनी या पैशांचा स्रोत शोधण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांची एकूण मालमत्ता ८० कोटी रुपयांपेक्षा जास्त असावी असा अंदाज आहे. परंतु, या भावंडांनी इतकी अफाट संपत्ती कशी मिळवली? याबाबत पोलीस अन् आयकर विभाग तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय? पोलिसांनी २८-२९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही कारवाई केली. महाराष्ट्रातून कोविड काळात घरी परतलेले दोन भाऊ अचानक श्रीमंत झाले. घर, गाड्या, जमिनी, व्यवसायही उभारला. नवरात्रीत देवी मूर्ती विसर्जनावरुन वाद झाला होता. त्यानंतर पोलिसांना कोणीतरी यादव भावंडांनी घरात काळा पैसा लपवल्याची माहिती दिली. पोलिसांनी घरावर छापा टाकण्यापूर्वी गावातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. ४०हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी घराला वेढा घालून खोदकाम सुरू केले. या भावांच्या घरातील ओट्याखाली जमिनीमध्ये गाडलेले तीन निळे ड्रम पोलिसांना आढळले. या ड्रममध्ये, पॉलिथिन आणि कापडात गुंडाळून ठेवलेली ५००च्या नोटांची जुडगी सापडली. तब्बल ३.२ कोटी रुपयांची रोकड जप्त केली.
कोविड काळात राजेश राकेश पुण्यातून गावी परतले राकेश यादव आणि राजेश यादव असे दोघं भावांची नावे आहेत. हे दोघं महाराष्ट्रातील पुणे शहरात एका सुवर्ण व्यापाऱ्याकडे काम करत होते. कोविडमुळे त्यांनी आपली कामे सोडली आणि पुण्यातून आपल्या गावी परतले. गावी परतल्यानंतर त्यांनी करोडोंची जमीन खरेदी केली, आलिशान घर बांधलं, दोन ट्रॅक्टर, एक पिकअप तसेच बोलेरो गाडी घेतली. याव्यतिरिक्त, त्यांनी डीजे व्यवसाय अन् सिमेंटचा व्यापारही सुरु केला. या दोघांकडे अचानक आलेली संपत्ती बघून गावकरीही चकित झाले.
एवढी मोठी रक्कम पुण्याहून आणली? दोघंही भावंडं १९ वर्षे पुण्यात एका दागिने व्यवसायात काम करत होते. तिथे छापे टाकण्यात आले होते. संबंधित व्यावसायिकाने चलनी नोटांची जुडगे पोत्यात भरली आणि ती राजेश व राकेश राहत असलेल्या खोलीत लपवून ठेवली. त्या व्यापाऱ्याची एका प्रकरणात तुरुंगात जावं लागलं. दरम्यान, करोडो रुपयांच्या पिशव्या घेऊन हे आपल्या गावी पोहोचले, अशी शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, इतकी मोठी रक्कम घेऊन दोघं पुण्याहून प्रयागराजपर्यंतचा प्रवास कसा करू शकले? याबाबत चौकशी सुरु आहे.
या भावंडांनी प्रयागराज, प्रतापगड अन् उत्तर प्रदेशातील इतर जिल्ह्यांत कथितरीत्या खरेदी केलेल्या जमिनींविषयीची माहितीही गोळा करत आहेत. मात्र, आतापर्यंत पोलिसांना केलेल्या चौकशीतून ड्रममध्ये सापडलेल्या रोख रकमेच्या स्रोताबाबत कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. सुरुवातीला त्यांनी हा पैसा आपलाच असल्याचं मान्य केलं होतं, परंतु नंतर दोघांनी आपला दावा मागे घेतला.दोघही आपली विधाने वारंवार बदलत आहेत.