कलावंत कोणत्याही प्रांतातील असो, कोणत्याही कक्षेत्रातील असो; त्याच्या कलेच्या स्वप्नपूर्तीच्या प्रवासासाठी महत्त्वाचा असतो तो ध्यास. हा ध्यास कलावंताला अनेक अग्नीदिव्य पार करायला लावतो आणि यातून जो कलावंत तयार होतो तो असतो कलेचा अस्सल उपासक. त्यामुळे त्याच्याकडून सादर होणारी कलासुद्धा तेवढीच अस्सल आणि पवित्र असते. कलेच्या याच ध्यासाचं सार सांगत समर्पणाचं तत्त्व अधोरेखित करणाऱ्या 'फुलवरा' या चित्रपटाचं काम सध्या सुरू आहे. रवी जाधव दिग्दर्शित या सिनेमाचा टिझर नुकताच आला आहे. साधारणपणे १७ वर्षांपूर्वी आलेल्या नटरंग चित्रपटानं केवळ लावणीलाच नाही, तर मराठी चित्रपटांनाही नवसंजीवनी देण्याचं काम केलं होतं. या चित्रपटानं मराठी मनोरंजनविश्वात एक इतिहास रचला होता. आता पुन्हा एकदा लावणी आणि तमाशाच्या विश्वाचा प्रभावी अनुभव देण्याच्या प्रयत्नात रवी आहे. विशेष म्हणजे 'द फोक आख्यान' फेम हर्ष-विजय यांनी या सिनेमाचं संगीत केलं आहे.




रवीनं सिनेमाविषयी 'मुंटा'ला सांगितलं, 'लावणीचा विचार करताना आपल्या डोळ्यांसमोर तिचा ठेका, रंगमंचावरील ऊर्जा आणि कलाकारांची अदाकारी येते; पण या प्रत्येक गोष्टीमागे असते ती वर्षानुवर्षांची मेहनत आणि कलेशी असलेली अतूट बांधिलकी. ''च्या टीझरमधून आम्हाला हाच भाव पोहोचवायचा होता. वेगवेगळ्या वयोगटांतील मुलींच्या पायांतले घुंगरू आणि त्यांना लागलेले रक्त-माती ही त्या प्रवासाची प्रतीकं आहेत. मुळात या चित्रपटातून आम्ही सद्य परिस्थिती दाखवली आहे.