लखनऊ: भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या मुलानं विषारी पदार्थ खाऊन जीव दिला. त्याला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रवल गुप्ता (२६) असं त्याचं नाव आहे. गाझियाबादमध्ये खासगी नोकरी करणाऱ्या प्रवलचा विवाह वर्षभरापूर्वी २ नोव्हेंबर २०२५ रोजी झाला होता. प्रवलचं कुटुंब मेरठमध्ये वास्तव्यास आहेत. त्याचे वडील राजीव गुप्ता भाजपचे मंडल उपाध्यक्ष आहेत.
प्रवल गु्प्ताचा विवाह ऋषीनगरची रहिवासी स्नेहा गुप्ताशी वर्षभरापूर्वी झाला होता. स्नेहा आणि तिच्या कुटुंबाकडून येणाऱ्या धमक्यांमुळे प्रवल त्रासला होता. जीव देण्यापूर्वी प्रवलनं एक व्हिडीओ चित्रित केला. आपल्या मृत्यूला पत्नी स्नेहा गुप्ता आणि तिचं कुटुंब जबाबदार असल्याचा आरोप प्रवलनं व्हिडीओच्या माध्यमातून केला. 'लग्नानंतर काही दिवसांनीच मला आणि माझ्या आई, वडिलांना मानसिक त्रास दिला जाऊ लागला. पत्नी माझ्या आईला मारहाण करायची. बहिणीसोबत गैरवर्तन करायची. तिला संपूर्ण संपत्ती स्वत:च्या नावावर करून घ्यायची होती. ३१ ऑक्टोबरला पोलीस लाईनच्या कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पत्नीनं आमच्यावर गंभीर आरोप केले होते,' असं प्रवलनं व्हिडीओत म्हटलं आहे.
लेकाच्या मृत्यूनंतर भाजप नेते राजीव गुप्ता यांची प्रकृती बिघडली. 'आजच्याच दिवशी मी माझ्या लेकाची वरात घेऊन आलो होतो आणि आता वर्षभरानंतर मी त्याची दुसरी वरात (अंत्ययात्रा) नेतोय. त्यात काही अशीही मंडळी आली, ज्यांना बोलावलं गेलं नव्हतं,' अशा शब्दांत गुप्ता यांनी त्यांचं दु:ख व्यक्त केलं. प्रवलच्या आईनं सुनेवर गंभीर आरोप केले. 'सून घरातलं काहीच कामं करायची नाही. ती तासनतास फोनवर बोलायची. लेकावर वेगळं राहण्यासाठी सतत दबाव टाकायची,' असा आरोप प्रवलची आई किरण गुप्ता यांनी केला.
पोलीस अधिकारी शिव ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी कंकरखेडाच्या हद्दीत एका तरुणानं विषारी पदार्थ खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तरुणाचा त्याच्या पत्नीशी वाद सुरू होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. पोलीस लाईन कुटुंब समुपदेशन केंद्रात त्यांचा विषय आला होता. तिथे त्यांचं समुपदेशन सुरू होतं. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.