सुधीर पाटील, सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निकालानंतर काही वेळातच महायुतीतील कुरबुर समोर आली आहे. महायुतीच्या माध्यमातून लढताना भाजपने जागावाटपाचा निर्णय प्रामाणिकपणे अंमलात आणला. मात्र मित्रपक्षांकडून त्या पद्धतीने युतीधर्म पाळला गेला नाही. काही ठिकाणी मित्रपक्षांनीच भाजपच्या उमेदवारांना अडचणीत आणल्याने विजयाच्या संधी हुकल्या. भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली असती, तर जिल्हा बँकेच्या सर्व जागांवर पक्षाचा झेंडा फडकला असता, अशी प्रतिक्रिया मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेते गोरेंच्या वक्तव्यावर काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.




सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून लढताना भाजपने जागावाटपाचा निर्णय प्रामाणिकपणे अंमलात आणला, असे जयकुमार गोरे म्हणाले. जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार झाला होता. त्यांच्या निर्णयाचा आदर करून भाजपने जागावाटप स्वीकारले. ज्या मतदारसंघात मित्रपक्षाचा उमेदवार होता, तिथे त्याच्या विजयासाठी भाजपने ताकद लावली. मात्र, काही ठिकाणी मित्रपक्षांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, असा थेट आरोप गोरे यांनी केला.




जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली नाराजीशब्दाला जागणे ही आमची भूमिका आहे. मात्र, युतीतील सर्वांनीच ती भूमिका घेतली नाही, अशी नाराजी जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली. माणमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ११६ मते, खटावमध्ये १४४ आणि भाजपला ११२ मते मिळाली. महायुतीच्या उमेदवाराला १०४, तर अपक्षाला ९९ मते मिळाली. फलटणमध्ये रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी चांगले मतदान घेतले; मात्र समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांना अवघ्या पाच मतांनी पराभव स्वीकारावा लागल्याचे सांगत भाजप उमेदवारांना महायुतीतील काही घटकांकडून अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाल्याचा खळबळजनक आरोप गोरे यांनी केला.




गोरे यांचा मित्रपक्षांना सूचक इशारापदवीधर निवडणुकीप्रमाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही काही ठिकाणी निकालावर परिणाम घडविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप जयकुमार गोरे यांनी केला. या निवडणुकीतून भाजपला अनेक राजकीय धडे मिळाले आहेत. पुढील जिल्हा परिषद निवडणुकीत पक्ष अधिक आक्रमक आणि ठाम भूमिका घेईल. तसेच 'मला लढायचं माहीत आहे,' असा सूचक इशारा त्यांनी आपल्या विरोधकांसह मित्रपक्षांना दिला.




बँकेच्या अध्यक्षपदावर गोरे काय म्हणाले?सार्वत्रिक निवडणुकीतील राजकीय संघर्ष बँकेच्या कामकाजात आणू नये, अशी भूमिकाही गोरे यांनी स्पष्ट केली. निवडणूक संपली आहे. त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून बँकेच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे. 'जो दे उसका भी और न दे उसका भी भला', असा टोलाही गोरे यांनी लगावला. तसेच बँकेच्या अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय घेतील. पक्षाचे आणि महायुतीचे वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल, तो सर्वांना मान्य असेल, असे सांगत गोरे यांनी अध्यक्षपदाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवला.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.