पुणे : पुण्याच्या मुकुंदनगर परिसरात एका श्रीमंत कुटुंबातील 34 वर्षीय सुनेने स्वत:ला संपवून दिल्याच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. पायल झांबरे असं या विवाहीत महिलेचं नाव आहे. या महिलेच्या भावाने पोलिसांना दिलेल्या जबाबात तिच्या सासरच्या मंडळींवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच या प्रकरणाची एफआयआर प्रत समोर आली आहे. या एफआयआरमध्ये पायल झांबरे यांचे भाऊ ऋषीकेश पवार यांनी पायल यांच्या सासरच्या मंडळींवर हुंड्याचे, दागिने आणि पैशांच्या मागणीसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
एफआयआरमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?"माझी मोठी बहीण पायल हिचे लग्न अक्षय अरविंद झांबरे (वय 38 वर्षे) याच्याशी 13 मार्च 2019 रोजी आमच्या दोन्ही परिवारांच्या सहमतीने झाले होते. माझ्या बहिणीच्या सासरी तिचे पती अक्षय झांबरे, सासरे अरविंद झांबरे (वय 65 वर्षेः, सासू मंगल झांबरे (वय 58 वर्षे), नणंद अक्षता झांबरे /निमन (वय 30 वर्षे) असे एकत्र रहावयास होते. लग्नावेळी माझी बहीण पायल आणि तिचे पती अक्षय यांना मिळून अंदाजे 50 तोळे सोने, 25 लाख रुपये रोख रक्कम तसेच लग्नाचा सर्व खर्च हा आम्ही केला होता. लग्नाचा अंदाजे खर्च 70 ते 80 लाख रुपये केला होता", असा जबाब पायलचे भाऊ ऋषीकेश पवार यांचा एफआयआरमध्ये नोंदवण्यात आला आहे.
'सासरचे पायलला खर्चासाठी पैसे द्यायचे नाहीत'"लग्नानंतर दोन ते तीन महिन्यांनतर माझ्या बहिणीला तिची सासू मंगल या प्रत्येक सणाला पैसे घेवून ये, सोने घेवून ये असे सतत मानसिक त्रास देत होत्या. त्यामुळे आम्ही माझ्या बहिणीला काही त्रास व्हायला नको, म्हणून त्यांची प्रत्येक मागणी मान्य करुन पूर्ण देखील केली आहे. तसेच माझ्या बहिणीला घरकाम करण्यावरुन त्रास देत होते, तसेच तिला खर्च करण्यास पैसे देत नव्हते. त्यामुळे तिला खर्चाला देखील आम्हीच पैसे देत होतो", असा दावा पायलच्या भावाने जबाबात केला आहे.
'गर्भवती असताना मुलगाच हवा अशी दमदाटी'"माझी बहिण हिने जर घरी तिचे पती अक्षय यांना पैसे मागितले तर ते पायलला बोलत होते की, तुझ्या खर्चासाठी तू स्वत: पैसे कमव, नोकरी कर आणि स्वत: चा खर्च स्वत: भागव. 2022 मध्ये माझी बहिण पायल ही गरोदर असताना तिची सासू मंगल, सासरे अरविंद, पती अक्षय हे सतत तिला मानसिक त्रास देत होते की, आम्हाला मुलगाच हवा आहे, तुला मुलगाच झाला पाहिजे, आमची समाजात प्रतिष्ठा आहे, त्यामुळे माझी बहिण गरोदरपणात सतत मानसिक दडपणाखाली, भितीखाली राहत होती", असादेखील आरोप करण्यात आला आहे.
'मुलगी झाल्यानंतर सांभाळणार नाही म्हटलं'"पायलची प्रसुती 30 मार्च 2023 रोजी झाल्यानंतर तिला मुलगी झाली. हे समजल्यानंतर तिचे सासरे, सासू व पती यांनी हॉस्पीटलमध्ये येवून पायलसोबत वाद केला होता की, आम्हाला मुलगा हवा होता. तुला मुलगी कशी झाली, आम्ही या मुलीला आणि तुलाही संभाळणार नाही, असे म्हणून हॉस्पिटलमधून निघून गेले होते, त्यावेळी देखील पायलच्या सिझेरियन प्रसुती झाल्याने हॉस्पीटलचे औषधोपचाराचा अंदाजे 2.5 लाख रुपये खर्च देखील आम्ही दिला होता", असा दावा पायलच्या भावाने केला आहे.
'सासरचे वर्षभर पायलला घ्यायला आले नाहीत'" हिला प्रसुतीनंतर आम्ही आमचे घरी मु.पो. श्रीरामनगर, खेड शिवापुर जिल्हा पुणे याठिकाणी घेवुन गेलो होतो. परंतु पायलचे सासरचे तिला 1 वर्ष झाले तरी परत घेवून जाण्यास आले नव्हते. आम्ही अथवा पायलने याबाबत तिचे पती अक्षय आणि सासू यांना विचारलेच तर सासरचे तिला बोलत होते की, आम्हाला मुलगा पाहिजे होता, तुला मुलगी झाली आहे, त्यामुळे तुम्ही दोघी एकडे पुण्याला यायचे नाही, तिकडेच माहेरी रहायचे. त्यानंतर माझे वडील आणि घरातील इतर वडीलधारी मिळून पायलचे सासरी झांबरे पॅलेस, मुकुंदनगर पुणे या ठिकाणी येवून बऱ्याच बैठका घेवून तिचे सासरे, सासू आणि पती यांची समजूत घालून पायल हिला तिच्या सासरी पाठविले होते", असं ऋषीकेश पवारने सांगितलं.
सासरच्यांकडून पुन्हा छळ झाल्याचा आरोप" हिला परत सासरी पाठविल्यानंतर पायल हिची सासु, सासरे, पती आणि नणंद हे सतत तिला मुलगी झाली म्हणून शिव्या देत असत, तुला आम्ही एवढं बोलतो याची लाज वाटत नाही का? तुला आम्ही सांगितलेले वस्तू अथवा पैसे आणायला जमत नसतील तर आपला दुसरा फ्लॅट आहे. तिकडे जा, तिथे दोरी आहे, नाहीतर तुझी ओढणी घेवून फॅनला तू व तुझी मुलगी लटकत का नाहीस, असे बोलून तिला सतत मानसिक त्रास देत होते", असं पोलिसांच्या जबाबत तिच्या भावाने म्हटलं आहे.
"पायल ही आमच्या घरी आली कि, आईला सर्व गोष्टी सांगायची. अथवा असताना घरी कोणी नसताना आईला फोन करुन सांगत होती. आम्ही प्रत्येकवेळी तिची तसेच तिचे पती, सासू सासरे यांची समजूत काढत होतो. त्यामुळे आम्ही कधीच घडल्या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही", असं पोलीस जबाबात पायलच्या भावाने म्हटलं.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.