>> रवींद्र पिंपळे


जलविद्युत प्रकल्पासाठी भीमाशंकरच्या जंगलात होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीवरून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. आता सह्याद्रीपाठोपाठ अजिंठ्याच्या डोंगररांगा सपाट करण्याचे कारस्थान समोर आले आहे. अजिंठ्याच्या राखीव वनक्षेत्रात येणाऱ्या नायगाव-वडोद येथे प्रस्तावित असलेल्या २ हजार मेगावॅटच्या ग्रीन को एनर्जी या कंपनीच्या पीएसपी स्वरूपाच्या जलविद्युत निर्मिती प्रकल्पासाठी डोंगराच्या पायथ्याशी असलेली १.७३ लाख झाडांची अमानुष कत्तल करण्यात येणार आहे. सोयगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाने हा धक्कादायक अहवाल दिला आहे.


अजिंठ्याच्या डोंगररांगामध्ये ग्रीन को एनर्जी या कंपनीचा पीएसपी स्वरूपाचा जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. डोंगरमाथ्यावर आणि पायथ्याशी अवाढव्य जलाशय उभारून त्यामाध्यमातून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी असलेले घनदाट जंगल भुईसपाट करण्यात येणार आहे. जवळपास १.७३ लाख झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. ही वृक्षतोड फक्त खालच्या बाजूची आहे. प्रकल्पाच्या वरच्या बाजूस येणाऱ्या वडोदा विठ्ठलाचे या भागातील वृक्षगणना गावकऱ्यांनी हाणून पाडल्यामुळे तेथे होणाऱ्या वृक्षतोडीचा नेमका आकडा कळू शकला नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही संख्या दोन लाखांच्या वर आहे.


अजिंठ्याच्या जंगलात मोहाची शेकडो वर्षे जुनी झाडे असून काही काही झाडांचा घेर २० फुटांपर्यंत आहे. वृक्षतोडीबरोबरच खालच्या बाजूस असलेले नऊ माती बंधारे तसेच नऊ वनराई बंधारेही उद्ध्वस्त होणार आहेत. सिल्लोड येथील पर्यावरण संवर्धक व सोयगाव वनपरिक्षेत्र विभागाच्या वन्यजीव मनुष्य संघर्ष समितीचे सदस्य असलेले डॉ. संतोष पाटील हे दोन वर्षांपासून या प्रकल्पाच्या विरोधात शासन दरबारी लढा देत आहेत. वाडी येथील आबा पाटील गव्हाणे, प्रफुल्ल पाटील, रवि राठोड यांनी जंगल वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.


झाडांसोबत वन्यजीवन ही धोक्यात


जलविद्युत प्रकल्प होत असलेला हा भाग गौताळा अभयारण्यापासून १४ किमी अंतरावर आहे. या प्रकल्पामुळे हिवरा, पूर्णा, मनुदेवी, खटकाळ, बहुळा, चारणा, खेळणा या नद्यांचे अस्तित्वच नष्ट होण्याची भीती आहे. त्याचबरोबर या जंगलातील तांडे, पाडे, वस्त्याही उद्ध्वस्त होणार आहेत. या भागातील शेतीही धोक्यात येणार असून पर्जन्यछायेतील भागास ही निसर्गाची हानी परवडणारी नाही. गौताळा अभयारण्यात वाघ, खवले मांजर, बिबट्या, अस्वल, लांडगे, कोल्हा, हरीण, भेकरे, तडस, काळवीट, अजगर, हिरवा, चापडा आदी शेकडो वन्यजीवांचा अधिवास येथे आहे. हा अधिवासही संकटात सापडणार आहे.


दररोजचा ६ कोटी लिटर ऑक्सिजन गमावणार


पूर्ण वाढ झालेले एक झाड रोज ३०० लिटर लिटर प्राणवायू वातावरणात उत्सर्जन करते त्या अर्थी ही १.७३ लाख खालच्या बाजूची व ४० हजारहून अधिक माथ्यावरची वडोद भागातील अशी २ लाखांहून अधिक वृक्ष तोड झाली तर आपण रोज ६ कोटी लिटर ऑक्सिजन – प्राणवायू गमावून बसू, तसेच एक झाड वर्षाला २५ किलो कर्बरूपी प्रदूषण शोषतो, त्याअर्थी ५० किलो कार्बन शोषला जाणार नाही व हा वायू हरित गृह वायू असल्याने व एल निनो निर्मितीचे एक कारण હવાવૂ असल्याने जागतिक तापमान वाढ होईल. खान्देश भागातील उष्णतेच्या तीव्र झळा आपल्या जिल्ह्यास सोसाव्या लागतील.
डॉ. संतोष पाटील, पर्यावरण अभ्यासक, सिल्लोड



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.