मागील दोन दिवस आम्ही ‘कोणता झेंडा घेऊ हाती...’ हे गाणे गात आहोत. या गाण्यात म्हटल्यानुसारच आमची स्थिती आहे. वर्तमानपत्रातील बातम्या वाचून आमचे नेहमीच असे होते. कोणी एक आपले मत मांडू लागला, की काही काळाने आम्हाला ते पटू लागते. सध्या तर एका बाजूने ‘ व्होटचोरी ’, ‘ एसआयआर ’ या गोष्टींना कडाडून विरोध आणि दुसरीकडे ‘ अराजकता ’, ‘ रेजीम चेंज ’ या गोष्टींची भांडाफोड असे सुरू आहे. मत मांडण्याचा अधिकार असलाच पाहिजे, यावर आम्ही अगदी ठाम आणि खरे सांगायचे तर हळवे आहोत. आम्हालाही भारतीय राज्यघटनेने हा अधिकार दिला आहे, हे आमच्याच घरातील इतरांना मान्य नाही. ‘बाबा, तुम्ही थांबा.




तुम्हाला काही कळत नाही,’ असे मुले; ‘आमचे हे कुठल्या शतकात असतात कोण जाणे...’ असे सौभाग्यवती आणि ‘लहानपणापासूनच हा मुखदुर्बळ आणि बोलायला तोंड उघडले, की वेगळेच काही तरी बोलून पचका करणार,’ असे जन्मदाते म्हणतात. आमच्या मताविषयी आमच्याच घरी हा एवढा ‘उत्साह’ असल्यामुळे शेवटी आम्ही हास्यक्लबात जायला सुरुवात केली. तेथे हसण्याच्या निमित्ताने का होईना; आम्हाला तोंड उघडण्याची संधी मिळते. आम्ही कोणाचाही मताचा अधिकार काढून घेण्याविरोधात आहोत आणि हळवे आहोत. हा मुद्दाही रास्त असल्याचे बहुतेकांना पटावे. आता खरे तर आम्ही एका बाजूचा झेंडा हाती घ्यायला हरकत नव्हती; परंतु दुसरी बाजू ऐकली आणि तीही पटली. ज्यांना मताचा अधिकार आहे, त्यांनीच ते नोंदवले पाहिजे. अधेमधे कोणी बोलता कामा नये, हे आमचे ठाम मत आहे. आम्ही बोलू लागलो, की कोणी ना कोणी मधेच स्वत:चा मुद्दा घुसवून आमचा मुद्दा मागे पाडते. रेजीम चेंज याविषयी तर आम्ही अधिक हळवे आहोत. रेशन कार्डावर ‘कुटुंबप्रमुख’; पण एकही निर्णय स्वत:च्या मताने न घेता येणारे... काय उपयोग या रेजीमचा? थोडक्यात काय, तर आम्ही दोन्ही बाजूचे ऐकतो, दोन्ही बाजूचे आम्हाला पटते आणि आम्ही दोन्ही बाजूचा झेंडा वेळोवेळी हाती घेतो. तुमचे असे होते का?

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.