श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड: मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांमध्ये यंदा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने आपल्या एका दिवसाचा पगार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिला आहे. या माध्यमातून जमा झालेला तब्बल एक कोटी रुपयांचा निधी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
पोलीस आयुक्तालयातील विविध प्रकल्प आणि विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. हा निधी राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होणार असून, त्यानंतर तो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले की, आपणही समाजाचं देणं लागतो. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. तो संकटात असताना त्याच्या मदतीला धावून जाणं ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. याच भावनेतून पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एका दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या या उपक्रमाचं यांनी कौतुक केलं. महाराष्ट्र राज्य देशात रिस्पॉन्स टाइमच्या बाबतीत अव्वल असून, राज्यात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आघाडीवर असल्याचं त्यांनी सांगितलं. पिंपरी-चिंचवड पोलिसांचं कौतुक करावं तेवढं कमी असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. आजचे पोलीस चित्रपटांमधील पोलिसांसारखे राहिले नसून, ते तातडीने घटनास्थळी पोहोचतात, असं मिश्किल विधान करताना मुख्यमंत्र्यांना हसू आवरलं नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पिंपरी-चिंचवड पोलिसांचं कौतुक करत शहराच्या विकासाचा उल्लेख केला. पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक अभिमानाने आपण या शहरात राहतो, असं सांगतो, असं ते म्हणाले. तसेच पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीत आणि विकासात स्वर्गीय अजित पवार यांचा सिंहाचा वाटा असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही अजित पवार आणि पिंपरी-चिंचवड यांच्यातील नात्याच्या आठवणींना उजाळा दिला. पिंपरी-चिंचवडचं नाव घेतलं की अजित पवार यांचं नाव हमखास समोर येतं. या शहराशी त्यांचं एक वेगळंच नातं होतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.