डॉ.‌‍ सुनील शिंदे




भारतीय दीपोत्सव परंपरेची सुरुवात वसुबारसेने (गोवत्स द्वादशी) होते ही बाब आणि भावनाच परम उदात्त आहे. साधूसंत - ऋषीमुनी, कवींनी गोवत्स रूपाचे महत्त्व अन् कौतुक अजरामर केल्याचे दिसेल. ‘कान्हू घेउन जाय रानी, धेनू घेउन जाय, संगे चाले श्रीदाम सुदाम, मागे बोले माय!’ या विख्यात रचनेने कवयित्री शांता शेळके यांनी गाईगुरांच्या ममतेला परम उंचीवर नेऊन ठेवले आहे. एक प्रकारे कृषी संस्कृतीचा पाया प्रकाशमान करणारी - उजळून टाकणारी ही दीपोत्सवाची, वसुबारसेची सुरुवात आनंद पेरणारी आहे.




पंढरीचा राणा श्री विठ्ठलास गाय आणि मायस्वरूपाने काळजात स्थान देऊन जणू सावलीस सावली मिळे अगदी थेट तसेच तसेच आपले मन विठू माउलीपाशी खेळते असे भावनिक ओलाव्याचे नाते प्रकट करताना संत जनाबाई काय म्हणतात पाहा -




मी वत्स माझी गाई । विठ्ठल वो माझी माई ॥




तहान भूक विसरले ।




तुझ्या पाऊली चित्त ठेविले ॥




गाय वासराचे सुंदर रूपक आणि भगवंताच्या चरणी मिळालेला ठाव ही विलक्षण हळवी भावना आध्यात्मिक जाणीव अधिक प्रगल्भ करते. माय लेकराचे नाते दृढ करते. संत गाडगेबाबांच्या कीर्तनात ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे त्यांचे आवडते पद हमखास असायचे. गोपालक श्रीकृष्णाचे गाईगुरांचे बालपणीचे अतूट नाते अधोरेखित करणारे असे अनेक संदर्भ भारतीय कथा कीर्तनी तसेच प्रवचनांतून सातत्याने नजरेस पडतात. वसुबारस मानवाला कृतज्ञता शिकवते. ज्या गाईच्या दुधावर पोषण होते तसेच जिचे वासरू यथाकाल शेतात राबून अन्न पिकवण्यास मदत करते, तिच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता खरे तर हा दिवस विचारात घ्यायला हवा.




प्राणी, पक्षी, मूक जीवांकडे जिव्हाळा - कृतज्ञता असतेच असते. माणसाला मात्र कृतज्ञता, जाणीव, स्नेह, आपुलकी शिकवावी लागते. हा फरक अंतर्मुख करायला लावतो. गाय-वासरांसह अनेक पाळीव प्राणी उतमात करत नाहीत. कृतघ्नपणा करत नाहीत. त्यांच्यात सूडभावना नसते. ते मिळालेल्या आयुष्यात कृतज्ञ असतात. लळा लावतात. जीवाला जीव देतात. सजग संवेदनशील जाणीव जपताना दिसतात! आध्यात्मिक - आत्मिक शिकवण ती आणखी काय वेगळी असू शकते महाराज!

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.