राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या दोघांसह पक्षाच्या सहा प्रमुख नेत्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी दिल्लीला बोलावून घेतले व त्यांच्या पक्षातील कलहाबाबत चिंता व्यक्त केली. ‘हा कलह मिटवा; अन्यथा आपल्याला सोबत ठेवणे आम्हाला फायदा सोडा, तोटाच देणारे ठरेल,’ असा स्पष्ट संदेश शहा यांनी या नेत्यांना दिला आहे. मुळात एका पक्षाच्या नेत्यांना दुसऱ्या पक्षाच्या नेत्याने बोलावून असे काही सांगणे हीच त्या पक्षासाठी मोठी नामुष्की. ती ओढवण्यामागे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षात आलेली निर्नायकी हे एकमेव कारण नसून पक्षाची धुरा असलेल्यांचा हेकेखोरपणाच त्यास कारणीभूत आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय राष्ट्रवादीत एकमुखाने झाला होता. अजितदादांच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पक्षात गोंधळाचे वातावरण उद्भवू नये यासाठी दुःखाचा डोंगर पचवून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली तेव्हा त्यांच्याप्रमाणे अजित पवार यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते व चाहते यांचेही डोळे पाणावले होते.




पुढे मुंबईतील पक्ष अधिवेशनात सुनेत्रा पवार यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. त्याच वेळी प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष व सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. पुढे हळूहळू अजित पवार यांचे कुटुंबीय आणि पटेल, तटकरे यांच्यातील संबंध ताणले जाऊ लागले. पटेल हे कार्याध्यक्ष नसल्याचे सांगणारे सुनेत्रा पवार यांचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले. त्यातून हा तणाव चव्हाट्यावर आला. या सगळ्यामागे अजित व सुनेत्रा पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार असल्याचे पटेल व तटकरे यांचे समर्थक उघडपणे बोलू लागले; तर पार्थ यांचे समर्थक ‘या दोन नेत्यांनी पक्ष गिळंकृत करण्याची कटकारस्थाने सुरू केली आहेत,’ असे सांगू लागले. दोन्ही बाजूंनी सामंजस्याने विचार करून हे वाद मिटवावेत, असे प्रयत्न पक्षात कुणीही केले नाहीत. मुळात, असे राजकीय सामंजस्य असलेली कुणी व्यक्ती त्या पक्षात उरली आहे का, हाच प्रश्न आहे. त्यामुळे दोघांमधल्या भांडणाचा आपल्याला लाभ कसा होईल, याचीच वाट बघत इतर सारे आशाळभूतपणे बसले आहेत, असेच सध्याचे चित्र आहे.




पार्थ यांनी आपले नवे साथीदार जमवण्याच्या अट्टहासापायी जे हौशे-नवशे आजूबाजूस जमा केले आहेत, त्यांना ‘विदूषक’ म्हणणे हादेखील त्यांचा सन्मान ठरेल. त्यांनी पार्थ यांच्यापुढे पक्षाच्या देशातील स्थानाबाबत नक्की कोणते चित्र उभे केले आहे याची कल्पना नाही; मात्र जे ऐकण्यास मिळते त्यावरून देशाची सत्ता एकहाती स्वतःपाशी एकवटल्याच्या थाटातच ‘देवगिरी’वरून आदेश जारी केले जाऊ लागले! वर्षानुवर्षे या पक्षात राहून राजकारण केलेल्यांना त्यांच्या कामगिरीबाबत जाब विचारले जाऊ लागले. ‘तुम्हाला मंत्री का ठेवावे,’ असे निरोप अनेक मंत्र्यांना धाडले जाऊ लागले. त्यात बिहारमध्ये भाजपच्या विरोधात प्रचाराची राळ उडवून देणारे प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून नेमणूक झाली; जी उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरली. दिल्लीतील भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला हे पसंत पडणे शक्यच नव्हते. याबाबत सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांना अनेक सुज्ञांनी सांगूनही पाहिले. मात्र, ‘आपल्या पक्षाचे निर्णय आपणच घेऊ’ असे बाणेदार उत्तर त्यांना देण्यात आले. अशा बाणेदारपणाची किंमत चुकवावी लागते याचा अंदाज बहुधा तेव्हा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आला नव्हता! मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव अधूनमधून कसे येत राहील, याची रणनीती कोण आणि का आखत होते, याचा काहीही विचार राष्ट्रवादीच्या नेतृत्वापाशी नव्हता व नाही. राजकारण हे सगळ्यांना सोबत घेऊन करायचे असते, त्यात बेरीज तारून नेते आणि वजाबाकीचा भागाकार होऊन त्याचा घाव वर्मी बसतो, याची जाण नेतृत्वाला असावी लागते. आज भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने राष्ट्रवादीतील या अनागोंदीबाबत त्यांच्या नेतृत्वाचे कान उपटले आहेत. दिवाळीच्या तोंडावर पक्षात असे फटाके फुटत असताना, गाढव आणि ब्रह्मचर्याबाबतचा तुकोबांचा अभंग राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजून घ्यावा, इतकाच अनाहूत सल्ला या निमित्ताने त्यांना देणे भाग आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.