आज बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला पक्षाचे बडे नेते उपस्थित होते. ज्यामध्ये पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, कमिटीचे सदस्य दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, समीर भुजबळ धनंजय मुंडे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.




पक्षातील अंतर्गत वादावर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांनी मौन बाळगल्याचीही माहिती समोर आली आहे. अलिकडेच मुंबईतील कार्यकर्ते नाराज असल्याचे समोर आले होते, पार्थ पवारांनी झिशान सिद्दीकी आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदावर उमेश पाटील यांची नियुक्ती केली होती. या नियुक्तीमध्ये कमिटीला विचारात घेतले नसल्याचा आरोप करत त्यामध्ये फेरविचाराची शक्यताही वर्तवण्यात येत होती. पण पक्षाने स्पष्ट केलं आहे की या नियुक्त्या कायम राहणार आहेत. दोघेही पुढील सहा महिने काम करतील, त्यांच्या कामाचे मूल्यमापन करु मग पुढील निर्णय घेऊ अशा प्रकारची भूमिका पार्थ पवारांनी या बैठकीमध्ये मांडली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.




दिवाळीनंंतर घेणार मुख्यमंत्र्यांची भेट


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या बैठकांची मालिका सुरू आहे. याच मालिकेतील एक महत्त्वाची बैठक देवगिरी निवासस्थानी पार पडली. ही कोअर कमिटीची बैठक सुमारे दीड तास चालली. अजित पवारांच्या मृत्यूसंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याशिवाय दिवाळीनंतर आता पक्षाचे सर्व आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, यावेळी सीआयडी चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर मांडावा अशा स्वरुपाची मागणी हे आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादीतील घडामोडी या चर्चेमध्ये आहेत.




दरम्यान, अशीही चर्चा आहे की, वरिष्ठ नेत्यांचा गट हा पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे. त्या पार्श्वभूमिवर या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीमध्ये पार्थ पवारांनी सर्व कमिटीला विचारुन निर्णय घेईल असा शब्द दिला असल्याचे समजते आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.