मुंबई : दिवाळीच्या सणासुदीच्या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात असताना, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन दूध, खाद्यतेल, मिठाई, खवा, नमकीन आणि दुग्धजन्य पदार्थांवर करण्यात आलेल्या राज्यव्यापी कारवाईची माहिती दिली. FDA हे जनतेच्या आरोग्याचे संरक्षण करणारे कवच आहे. बाजारात कुठेही खाद्यपदार्थांमध्ये चुकीचे प्रकार किंवा भेसळ आढळल्यास नागरिकांनी थेट आमच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
सणांच्या काळात मिठाई आणि खव्याला मोठी मागणी असते. या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी ग्राहकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत:
परवाना तपासा: ज्या दुकानाकडे एफडीएचा (FDA) वैध परवाना असेल तेथूनच खरेदी करा.
मर्यादित खरेदी: नागरिकांनी आवश्यक असेल तेवढीच मिठाई खरेदी करावी. 02 दिवसांत संपेल एवढाच साठा आणावा; 08 दिवसांसाठी पुरेल एवढी मिठाई आणून फ्रिजमध्ये ठेवू नये.
लेबल नसलेला खवा टाळा: लेबलिंग नसलेला किंवा मुदतबाह्य झालेला खवा आणि स्वस्त, भडक रंगाचा माल खरेदी करू नये.
खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी एफडीए आयुक्तांनी खालील नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत:
दूध व तूप: सुटे किंवा कच्चे दूध घेण्याऐवजी पॅक केलेले दूध घ्यावे. तुपामध्ये किंवा तेलामध्ये कोणत्याही प्रकारची प्राण्यांची चरबी (Animal Fat) किंवा रासायनिक भेसळ खपवून घेतली जाणार नाही.
पुनर्वापर केलेले तेल: तळणीच्या खाद्यतेलाचा वारंवार (Repeated Use) वापर करू नये.
कृत्रिम रंग: लाडू किंवा इतर मिठाईमध्ये रासायनिक रंगांचा अतिरिक्त वापर करू नये. नैसर्गिक रंगांचा वापर मर्यादेतच करावा. नियमांचे उल्लंघन करणारे भडक रंगांचे अन्नपदार्थ एफडीआेकडून नष्ट (Destroy) करण्यात आले आहेत.
चांदीचा वरक (Silver Foil): मिठाईवर लावण्यात येणारा चांदीचा वरक शुद्धच असावा. चांदीऐवजी ॲल्युमिनियमचा (Aluminium) वापर केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
दिवाळीनिमित्त दिले जाणारे गिफ्ट बॉक्स, चॉकलेट्स, केक आणि मोदक खरेदी करताना त्यावर लेबलिंग (Labeling) आणि मुदतबाह्य तारीख (Expiry Date) तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा गिफ्ट व्हॉउचर किंवा हॅम्परमध्ये मुदतबाह्य वस्तू दिल्या जाण्याची शक्यता असते.
त्यामुळे सर्व माहिती घेऊनच नागरिकांनी खरेदी करावी, असे सांगत एफडीएने भेसळमुक्त सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.