चंदिगढ: दिवसाढवळ्या एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा तरुण त्याची दुचाकी दुरुस्त करून घेण्यासाठी गॅरेजला गेला होता. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या ३ तरुणांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. पोटात गोली लागल्यावर तरुणानं जखमी अवस्थेत त्याची आई आणि मित्राला कॉल केला आणि घडलेला प्रकार सांगितला. तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
हरयाणाच्या रेवाडीमध्ये एका तरुणाची गोळ्या झाडून दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. मृताची ओळख पटली आहे. मनोज असं त्याचं नाव आहे. तो गोकलगढ गावचा रहिवासी होता. मनोज दीड महिन्यांपूर्वी तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता. या हत्याकांडाच्या मागे पूर्ववैमनस्य आणि गँगस्टारची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात ३ आरोपींची नावं समोर आली आहे. मणिंद्र, विशाल आणि महेश अशी त्यांची नावं आहेत. तिन्ही आरोपी हत्येनंतर फरार आहेत.
गोकलगढ गावच्या बस थांब्याजवळ असलेल्या गरिमा बाईक रिपेयरिंग सेंटरवर दुपारच्या बुधवारी दुपारच्या सुमारास गोळीबाराची हत्या घडली. मनोज त्याची दुचाकी दुरुस्त करण्यासाठी तिथे गेला होता. त्याचवेळी एका दुचाकीवरून मनिंद्र, विशाल आणि महेश तिथे आले. तिघांनी आधी आसपासच्या भागाची रेकी केली. यानंतर मणिंद्रनं पिस्तुल काढून मनोजच्या पोटात गोळी झाडली.
गोळीबार होताच परिसरात एकच खळबळ उडाली. मनोजला गोळी लागताच तिन्ही हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले. गंभीर जखमी झालेला मनोज तिथेच कोसळला. त्यानंतर त्यानं आईला कॉल केला. माझ्यावर गोळीबार झाला आहे. पोटात गोळी लागली आहे, असं त्यानं आईला कळवलं. यानंतर मनोजनं त्याचा मित्र अभिषेकला कॉल करून घटनास्थळी बोलावलं. ही माहिती मिळताच अभिषेक पोहोचला. त्यानं जखमी मनोजला उपचारांसाठी रेवाडीतील रुग्णालयात दाखल केलं. त्याची गंभीर अवस्था पाहता डॉक्टरांनी त्याला विराट रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.
विराट रुग्णालयात मनोजवर उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण मनोजची प्राणज्योत मालवली. मनोजच्या अकाली मृत्यूनं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गुन्ह्याची माहिती मिळताच रेवाडीचे पोलीस अधीक्षक हेमेंद्र कुमार मीणा पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी शव ताब्यात घेऊन ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं. मनोजच्या वडिलांनी मणिंद्र, विशाल आणि महेश यांच्या विरोधात हत्येची तक्रार नोंदवली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.