पाटणा: यूपीएससी परिक्षेच्या तयारीच्या दिवसांमध्ये साथ देण्याचं वचन आणि मग आयपीएसच्या गणवेशापर्यंतचा प्रवास. भानु प्रताप सिंह यांनी खडतर प्रवास करत खाकीचं स्वप्न पूर्ण केलं. २०१६ मध्ये त्यांनी पूजा सिंह यांच्या सोबत लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. यानंतर भानु प्रताप सिंह आयपीएस अधिकारी झाले. बिहारच्या खगडिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बनले. पण त्यांच्या खासगी आयुष्यातील वाद जगजाहीर झाला. अवघड काळात भक्कम साथ देणाऱ्या पूजा सिंह यांनी पती आणि सासरच्यांवर गंभीर आरोप केले. सहा वर्षांच्या लेकी सोबत भानू प्रताप सिंह बोलू देत नसल्याचा दावा केला. यानंतर बिहार सरकारनं भानू प्रताप सिंह यांची खगडियाच्या पोलीस अधीक्षक पदावरून उचलबांगडी केली. त्यांना पाटणातील पोलीस मुख्यालयात बोलावण्यात आलं.
भानू प्रताप सिंह यांच्या जागी शिवहरचे पोलीस अधीक्षक शैलेंद्र सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सगळ्यात भानू प्रताप सिंह यांचा पत्नी सोबत सुरू असलेला वाद सातत्यानं चर्चेत राहिलेला आहे. पत्नीची तक्रार, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आणि महिला पोलीस ठाण्यापर्यंत गेलेलं प्रकरण, हा सगळा घटनाक्रम चर्चेत राहिला.
२०२३ मध्ये 12th फेल नावाचा सिनेमा आला होता. आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांचं संघर्षमय आयुष्य, आयपीएस होण्याचं स्वप्न, त्यात त्यांच्या प्रेयसीनं दिलेली साथ आणि स्वप्न पूर्ण झाल्यावर दोघांनी बांधलेली लगीनगाठ, असा प्रवास सिनेमात पाहायला मिळाला. भानू प्रताप सिंह यांनीही असाच काहीसा संघर्ष केला. त्यात त्यांना पूजा सिंह यांनी खंबीर साथ दिली. पण आता त्यांच्यातील वादानं भानू प्रताप सिंह यांची खुर्ची गेली. त्यांना पोलीस अधीक्षकपद गमवावं लागलं.
भानू प्रताप सिंह यूपीएससीची तयारी करत असताना, करिअरसाठी झगडत असताना पूजा सिंह यांनी त्यांची साथ दिली. भानू प्रताप सिंह यूपीएससी उत्तीर्ण झाले. भारतीय पोलीस दलात त्यांची निवड झाली. ते २०२१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भानू प्रताप यांच्या सोबत लग्न करण्यासाठी पूजा सिंह घरातून पळाल्या होत्या. भरतपूरमध्ये त्यांनी शिक्षिका म्हणून काम केलं. भानू प्रताप अभ्यास करत असताना कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सावरलं.
पती आणि सासरच्यांविरोधात तक्रार करणाऱ्या पूजा सिंह यांना घटस्फोट नको आहे. आपलं कुटुंब तुटावं असं त्यांना वाटत नाही. पती सोबत पुन्हा एकदा संवाद साधावा आणि कुटुंब एकत्र यावं, हीच त्यांची इच्छा असल्याचं त्या सांगतात. पती आणि ६ वर्षीय लेकीसह नव्यानं सुरुवात करण्याची त्यांची इच्छा आहे. पतीनं कुटुंबाला सोबत राहण्याची तयारी दर्शवल्यास पोलीस तक्रार मागे घेईन, असं पूजा यांनी म्हटलं आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.