पॅरिस: बॉम्बेच्या धमक्यांमुळे हवाई उड्डाण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अनेक प्रवासी विमानांना त्यांचे मार्ग बदलण्याची वेळ आली. काही विमानं सुरक्षेच्या कारणास्तव अन्य ठिकाणी उतरवण्यात आली. वेगवेगळ्या देशांच्या विमानतळांवर सुरक्षा तपासण्या सुरू झाल्या आहेत. एका आठवड्यात दुसऱ्यांदा अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे युरोपमधील अनेक देशांची चिंता वाढली आहे.






आयर्लंडच्या एअर लिंगसचं EI402 क्रमांकाचं विमान डबलिनहून रोमला जात होतं. सुरक्षा अलर्ट मिळताच ते फ्रान्सच्या एव्रेक्स विमानतळावर उतरवण्यात आलं. हे ठिकाण राजधानी पॅरिसपासून जवळपास १०० किलोमीटर अंतरावर पश्चिमेला आहे. तर हेलसिंकीहून रोमला जाणाऱ्या फिनएअरच्या विमानाला इटलीच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी सुरक्षा पुरवली. रोमच्या फ्युमिचिनो विमानतळावर उतरल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. पण त्यात बॉम्ब किंवा स्फोटक सापडलं नाही.






बेल्जियममध्ये पोलंडची एअरलाईन कंपनी LOTचं विमान सुरक्षा अलर्ट मिळाल्यावर ब्रुसेल्सच्या जावेंटम विमानतळावर उतरलं. या विमानात कोणतंही धोकादायक किंवा संशयास्पद सामान सापडलं नसल्याची माहिती एअरलाईन कंपनीनं दिली. बुल्गेरियातही बॉम्बच्या धमक्यांनंतर तीन विमानांनी इमर्जन्सी लँडिंग केलं. कोपेनहेगन आणि माद्रिदहून येणारी दोन विमानं सोफियामध्ये उतरली. तर लंडनहून येणारं एक विमान प्लोवदिवमध्ये उतरवण्यात आलं. झेक प्रजासत्ताकच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रागला जाणाऱ्या चार विमानांमध्ये आयईडी असल्याच्या धमकी मिळाली होती. या धमक्या कमी जोखमीच्या असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण सुरक्षेच्या सगळ्या उपाययोजना करण्यात आल्या.






मिलानहून बुखारेस्टला जाणाऱ्या विज एअरच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. यानंतर २०० प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आलं. विमान सुरक्षितपणे हेन्री कोआंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलं. यानंतर स्फोटकं निकामी करणाऱ्या पथकानं विमानाची झाडाझडती घेतली. या घटना मंगळवारी मिळालेल्या धमक्यांनंतर दोन दिवसांनी घडल्या आहेत. त्या दिवशी सात विमानं आणि एका क्रूझ जहाजाला बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली होती. पण तपासात कोणतंही स्फोटक सापडलं नाही. आतापर्यंत कोणत्याच देशानं किंवा संघटनेनं या धमक्यांची जबाबदारी घेतलेली नाही.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.