नागपूर : "राहुल गांधी तुम्ही सांगितलं की, आता लढाई संसदेत नाही तर रस्त्यावर होईल. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान अस्तित्वात असेपर्यंत ही लढाई संसदेतच होईल. वेळ पडली तर रस्त्यावरही उतरू. तुम्ही शंभर येणार असाल तर आम्ही हजार येऊ, तुम्ही हजार येणार असाल तर आम्ही एक लाख येऊ आणि तुम्ही लाखोंच्या संख्येने येणार असाल तर आम्ही एक करोडनी येऊ",’ अशा आक्रमक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले. ही लढाई भाजपची नसून देशाचे संविधान आणि लोकशाही वाचविण्याची असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
देशभरात महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियाना अंतर्गत गुरुवारी नागपुरातून भव्य पदयात्रेने या अभियानाचा समारोप झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.
फडणवीसांचा राहुल गांधींवर गंभीर आरोप"राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील व्यवस्था बदलण्याचे षडयंत्र सुरू आहे. संविधानाच्या नावाखाली संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांबद्दल जनतेच्या मनात अविश्वास निर्माण करण्याचे काम केले जात आहे. देशात अति डावी विचारसरणी आणण्याचा प्रयत्न सुरू असून नेपाळ आणि बांगलादेशमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली, तशी व्यवस्था भारतात आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे", असा आरोपही त्यांनी केला.
'खोटा नरेटिव्ह तयार करुन बदनामीचा प्रयत्न'"रेजिम चेंजच्या नावाखाली भारताच्या संविधानातून निर्माण झालेल्या संस्था आणि व्यवस्थेत परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधी हे या प्रयत्नांचे नेतृत्व करीत आहेत. हातात संविधान घेऊन त्याच संविधानाच्या विरोधात काम केले जात आहे. संविधानाला विरोध केला तर जनता स्वीकारणार नाही, याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे न्यायपालिका आणि अन्य घटनात्मक संस्थांविरोधात खोटा नरेटिव्ह तयार करून त्यांना बदनाम केले जात आहे", असा आरोपदेखील फडणवीसांनी केला.
मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर घणाघात"काँग्रेसनेच यापूर्वी संविधानात बदल करून त्याची हत्या केल्याचा आरोप करताना त्यांनी १९७५ च्या आणीबाणीचा संदर्भ दिला. अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक अवैध ठरविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर काँग्रेसने बहुमताच्या जोरावर संविधानात संशोधन करून पंतप्रधानांना न्यायालयीन कक्षेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. इंदिरा गांधी यांना पदावर कायम ठेवण्यासाठी संविधानात बदल करण्यात आला. ही संविधानाची हत्या होती, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार आल्यानंतर संविधानातील ही तरतूद बदलून नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरक्षित करण्यात आला", असं मुख्यमंत्री म्हणाले.
लाल संविधान कुठून आणले? मुख्यमंत्र्यांचा सवाल"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात मूलभूत अधिकारांना सर्वाधिक महत्त्व दिले. देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळावेत आणि सरकारने हे अधिकार हिरावून घेतल्यास नागरिकांना सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयात दाद मागता यावी, अशी व्यवस्था त्यांनी निर्माण केली. मात्र, काँग्रेसने याच संविधानाच्या मूलभूत तत्त्वांशी प्रतारणा केली. जे तुमच्या आजीला जमले नाही, ते करण्याचा प्रयत्न तुम्ही सुरू केला आहे. ‘बॉटल तीच आहे, फक्त दारू बदलली आहे. हातात लाल संविधान कुठून आणले? संविधानाचा मूळ रंग निळा आहे, लाल विचारसरणीपासून संविधानाला धोका आहे", असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्री आणखी काय-काय म्हणाले?मतदारयादीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. "मतदारयादीतून वगळण्यात आलेली तीन कोटी नावे पुन्हा आणण्याची मागणी केली जात आहे. मात्र, त्यातील अनेक जण मृत झाले असतील, तर त्यांची मते कोण देणार?", असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
"बांगलादेशी नागरिकांना मतदानाचा अधिकार देऊन बहुमताची चोरी करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. बांगलादेशी नागरिकांना भारतात राहू देणार नाही आणि त्यांना मतदानही करू देणार नाही, केरळमध्ये मतदारयादी पुनरीक्षणाची प्रक्रिया झाल्यानंतर काँग्रेस निवडून आली, तेव्हा लोकशाही धोक्यात असल्याचे का सांगितले जात नाही? निवडणुकीत पराभव झाला की राहुल गांधी लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप करतात. मात्र, जनता सर्व काही जाणते. त्यामुळे या कथित षडयंत्राविरोधातील लढाई लोकशाहीविरोधी विचार संपेपर्यंत सुरूच ठेवावी लागेल", असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.