रांची: एका ट्रकनं अनेक जणांना चिरडल्याची घटना काल रात्री घडली. या अपघातात ७ जणांचा शेवट झाला. अपघात पाहायला गेलेल्या ७ जणांचा अपघाती मृत्यू झाल्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूमुखी पडलेले ७ जण एकाच कुटुंबातील आहेत.
झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा एका ट्रकनं अनेकांना चिरडलं. खुंटी कर्रा परिसरात एका स्कूटीचा अपघात झाला. चालकाचं स्कूटीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर तो झाडीझुडपांमध्ये पडला. तेव्हा तिथे असलेले काही जण त्याला बघायला धावले. याच दरम्यान एक भरधाव वेगातील १८ चाकांचा ट्रक तिथे आला. या ट्रकनं अनेकांना चिरडलं. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला. हे सगळे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.
खुंटी येथील कर्रा-तोरपा मुख्य रस्त्यावर पोडा येण्यापूर्वी जोने-लुदरू वळण आहे. तिथे भरधाव ट्रकनं अनेकांना चिरडलं. मृतांमध्ये चार महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. अपघातानंतर परिसरावर शोककळा पसरली. पाको देवी, कसीला देवी, मानहू देवी, गोलू कुमार, अंजली कुमारी, तुती कुमारी आणि सौरभ नायक अशी मृतांची नावं आहेत. अपघातात जखमी झालेल्या खुशबू कुमारीवर खुंटी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत्यूमुखी पडलेले सगळे जण जोने-मुदरू परिसरातील रहिवासी आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एक स्कूटी चालक जोने-लुदरू वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कोसळला. तो जवळच असलेल्या पुलाच्या शेजारच्या झुडूपांमध्ये जाऊन पडला. अपघाताची माहिती मिळताच आसपास राहणाऱ्या महिला आणि मुलं त्याला पाहायला आणि मदत करायला पुलाजवळ पोहोचले. त्याचवेळी तोरपाच्या दिशेनं अतिशय वेगात आलेल्या एका ट्रकनं रस्त्याच्या कडेला असलेल्या लोकांना चिरडलं.
या अपघातात सहा जणांचा जागीच शेवट झाला. तर अन्य एकानं उपचारादरम्यान जीव सोडला. अपघातानंतर दुर्घटनास्थळी आक्रोश पाहायला मिळाला. स्थानिकांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं मृतांचे शव जिल्हा रुग्णालयात नेले. रात्री सव्वा अकराच्या सुमारास १२ वर्षांच्या सौरभ नायकनं उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे मृतांचा आकडा सातवर पोहोचला. जखमी खुशबू कुमारीवर उपचार सुरू आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.