टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आज (07 नोव्हेंबर 2026) दुसरा वनडे सामना खेळला गेला. न्यूझीलंडने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या फलंदाजांना बरेच कष्ट घ्यावे लागले. अखेर 26 व्या षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात टीम इंडियाने 113 धावा केल्या आणि डकवर्थ लुईस नियमानुसार 4 विकेटने सामना जिंकला. या सामन्यात फलंदाजांनी निराश केलं. मात्र, हिटमॅन रोहित शर्माने अवघ्या 23 धावा करूनही आपल्या नावावर नवीन विक्रमाची नोंद केली आहे.
रोहित आता वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा जगातील नंबर वन फलंदाज बनला आहे. त्याने पाकिस्तानचा माजी स्फोटक अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडीत काढला आहे. आफ्रिदीने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यांमध्ये 50 षटकार मारले होते, तर आता रोहितच्या नावावर 51 षटकारांची नोंद झाली आहे. या विक्रमी यादीत वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल 45 षटकारांसह तिसऱ्या, तर श्रीलंकेचा दिग्गज सनथ जयसूर्या 41 षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे. यानंतर इंग्लंडचा जोस बटलर आणि विराट कोहली संयुक्तपणे 29 षटकारांसह पाचव्या स्थानी आहेत.