मुंबई : 'स्वाभिमान' आणि 'येड लागलं प्रेमाचं' या लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली लाडकी अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) हिच्यासाठी यंदाची दिवाळी अत्यंत खास ठरली आहे. सोहम बांदेकरसोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर पूजाची ही लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आहे. एका बाजूला नव्या घरातील सणाचा उत्साह आणि दुसऱ्या बाजूला 'झी मराठी'वर सुरू होणारी तिची नवीन मालिका 'येतेच आता मी नांदायला', अशा द्विगुणित आनंदात ती दिवाळी साजरी करत आहे.


पूजाची 'येतेच आता मी नांदायला' ही नवीन मालिका येत्या 30 नोव्हेंबरपासून प्रदर्शित होणार आहे. नवीन मालिकेच्या शूटिंगच्या धावपळीत फराळ बनवायला वेळ मिळाला नसला, तरी सासूबाई आणि आजीने बनवलेला फराळ खाऊन तिने दिवाळीचा मनमुराद आनंद लुटला आहे.


Pooja Birari New Serial : शूटिंगची धावपळ अन् सासूबाईंच्या हाताचे बेसनाचे लाडू


आपल्या दिवाळी सेलिब्रेशनबद्दल बोलताना पूजा म्हणाली, "दिवाळी हा माझा सगळ्यात आवडता सण आहे. नवीन वर्षाचे कॅलेंडर हातात आल्यावर मी सर्वात आधी दिवाळी कधी आहे, हेच बघते. सध्या नवीन मालिकेचे शूटिंग सुरू असल्याने मला फराळ बनवायला वेळ मिळाला नाही. मात्र, माझ्या सासूबाईंनी बेसनाचे लाडू आणि आजीने शंकरपाळी बनवली आहे. थोडक्यात, मी स्वतः काही बनवले नसले तरी फराळ मात्र पोटभर खाल्ला आहे."


ती पुढे गमतीने म्हणाली, एकीकडे पूजा म्हणून मी बांदेकरांच्या घरी नांदायला आले आहे, तर दुसरीकडे 'शिवानी कदम' बनून प्रेक्षकांच्या मनात 'येतेच आता मी नांदायला'


Soham Bandekar Gift : पहिल्या पाडव्याचे गिफ्ट अन् सोहमला ओवाळण्याची उत्सुकता


लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीबद्दल आणि पहिल्या पाडव्याबद्दल सांगताना पूजाने तिची उत्सुकता व्यक्त केली. "लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी असल्याने घरात वेगळाच उत्साह आहे. शॉपिंगचाही मोठा प्लॅन आहे. पहिल्या पाडव्याला सोहमला ओवाळणे आणि त्या बदल्यात ओवाळणी म्हणून सोहमकडून मिळणारे खास गिफ्ट, याबद्दल मला खूप उत्सुकता आहे," असे पूजाने आनंदाने सांगितले.


Pooja Birari Childhood Diwali Memories : एकत्र फराळाची परंपरा


आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना पूजाने सांगितले की, लहानपणी तिची दिवाळी मामाच्या गावाला आजी-आजोबांकडे साजरी व्हायची. त्यानंतर कॉलेजच्या दिवसांत तिने पुण्यात दिवाळी साजरी केली. "फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबद्दल मला लहानपणापासूनच माहिती होती. त्यामुळे आई-बाबांनी मला कधी रोखले नाही, तरी मी अवघे 2 ते 3 फटाके फोडायची आणि भरपूर दिवे लावून दिवाळी साजरी करायची. लहान वयातच दिवाळीची खरी मजा फटाक्यांमध्ये नसून कुटुंबासोबत वेळ घालवण्यात आहे, हे मला समजले होते," असे पूजाने स्पष्ट केले.


दिवाळीच्या काळात घरात दरवळणारा फराळाचा सुगंध आणि अभ्यंगस्नानानंतर कोवळ्या उन्हात बसून संपूर्ण कुटुंबाने एकत्र फराळ खाणे, ही त्यांच्या घरातील खास परंपरा असल्याचेही तिने आवर्जून नमूद केले.


ही बातमी वाचा:


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.