गोंदिया : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा ब्रीच कँडी रुग्णालयातला एक व्हिडीओ समोर आला होता. शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी प्रफुल्ल पटेल रुग्णालयात गेले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. यावेळी त्यांच्या भेटीच्या व्हिडीओत प्रफुल्ल पटेल 10 तारखेनंतर बैठक घेण्याबाबत बोलत असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत हालचाली सुरु झाल्याच्या चर्चांना उधाण आलं. अखेर या चर्चांनंतर आता खुद्द प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांसमोर येत 10 तारखेबाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.




प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले?"शरद पवार काही चेकअपसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. स्वभाविक आहे, मला वर्षानुवर्षे शरद पवार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे आशीर्वाद मिळाले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. खूप चांगल्या वातावरणात आमची तिथे भेट झाली. ईश्वराची कृपा आहे की, त्यांची तब्येत बरी झाली. ते आता घरी गेले आहेत. स्वभाविक आहे, भेटल्यावर थोडीफार चर्चा होते. पण काही विशेष चर्चा नव्हती", असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.




" आता डिस्चार्ज मिळाल्याने घरी आले आहेत. मी गोंदियातून मुंबईत गेल्यानंतर त्यांना भेटायचा नक्की प्रयत्न करेन", असंदेखील यावेळी म्हणाले.




"मी म्हणत होतो की, दिवाळीत 8 आणि 9 तारखेला मी गोंदियात जाणार आहे. त्यामुळे 10 तारखेला परत मुंबईत आल्यानंतर परत भेटायला येतो. कारण हॉस्पिटलमध्ये फार काही चर्चा करण्याची माझीदेखील इच्छा नव्हती आणि ते योग्य नव्हतं", असं म्हणाले.




"कुठलीही चर्चा आम्ही हॉस्पिटलमध्ये करणार आहोत का? शरद पवारांप्रती मनात सदैव आदर होता, आहे आणि राहणार आहे. शरद पवारांची प्रकृती बरी राहावी, त्यांनी राज्याला आणि देशाला दिशा देत राहावं ही सगळ्यांची इच्छा आहे आणि राहणार. म्हणून 10 तारखेबाबत मी एवढंच म्हटलं की, मी गोंदियाला जावून येतो. त्यानंतर हॉस्पिटलला नको तर मी घरी येतो. तेव्हा आपण चर्चा करु. त्याचा अर्थ काही राजकीय आहे असं समजू नका", असं आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांना केलं.




दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत पुन्हा चर्चा का?राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी बैठका झाल्या होत्या, असं मान्य केलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून याबाबतचे वृत्त फेटाळणाऱ्या सुनील तटकरेंनी अचानक हे वृत्त मान्य केलं. तसेच शरद पवारांना आजारी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला. त्यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. मोदींच्या फोननंतर प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीला गेले होते. या घडामोडींमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचाली सुरु झाल्याची चर्चा आहे. याशिवाय पार्थ पवारांनी देखील सलग दोन दिवस शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.