दिवाळी म्हटली की घराघरांत रोषणाई, फराळ आणि फटाक्यांचा उत्साह पाहायला मिळतो. मात्र, माणसांसाठी आनंदाचा असणारा फटाक्यांचा आवाज पाळीव प्राण्यांसाठी भीतीदायक ठरू शकतो. विशेषतः कुत्रे आणि मांजरी फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे घाबरतात. काही प्राणी थरथर कापतात, लपून बसतात, भुंकतात किंवा घराबाहेर पळण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी त्यांना ओरडण्याऐवजी प्रेमाने समजून घेणे गरजेचे आहे. दिवाळीत तुमच्या लाडक्या पाळीव प्राण्यांना सुरक्षित आणि शांत ठेवण्यासाठी या टिप्स नक्की वापरा.
सुरकशीत जागा
फटाक्यांचा आवाज कमी ऐकू येईल अशी घरातील शांत खोली निवडा. तिथे त्यांचे आवडते ब्लँकेट, खेळणी आणि पाणी ठेवा. या जागेमुळे त्यांना सुरक्षित वाटू शकते.
खिडक्या / दरवाजे बंद
फटाक्यांचा आवाज आणि प्रकाश घरात येऊ नये यासाठी खिडक्या, दरवाजे आणि पडदे बंद ठेवा. यामुळे बाहेरील आवाजाचा त्रास काही प्रमाणात कमी होतो.
संगीत किंवा टीव्ही
फटाक्यांचा आवाज झाकण्यासाठी घरात मंद आवाजात संगीत किंवा टीव्ही सुरू ठेवा. मात्र, आवाज खूप मोठा ठेवू नका.
त्यांना एकटे सोडू नका
फटाक्यांच्या वेळी पाळीव प्राण्यांना शक्यतो एकटे सोडू नका. त्यांच्या जवळ राहा आणि शांतपणे त्यांच्याशी बोला. त्यांना आवडत असल्यास प्रेमाने थोपटा.
फिरायला नेण्याची वेळ
फटाके सुरू होण्यापूर्वीच कुत्र्यांना फिरवून आणा. बाहेर नेताना पट्टा आणि सुरक्षित कॉलर वापरा. फटाक्यांच्या आवाजात त्यांना मोकळे सोडू नका.
जबरदस्ती करू नका
प्राणी घाबरून एखाद्या कोपऱ्यात लपले असतील, तर त्यांना जबरदस्तीने बाहेर काढू नका. त्यांच्या इच्छेनुसार सुरक्षित जागेत राहू द्या.
दिवाळीचा आनंद घेताना आपल्या मुक्या जीवांचाही विचार करा. फटाके शक्यतो टाळा आणि पाळीव प्राण्यांना प्रेम, सुरक्षितता व आधार द्या. कारण त्यांच्यासाठी तुमची सोबत हीच सर्वात मोठी दिलासा देणारी गोष्ट असते.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.