मुंबई : राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी पत्रकारांनी रोहित पवारांना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारले. या आरोपांवर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. "रामदास कदम यांनी काय आरोप केले ते मी ऐकलेले नाही. पण काही लोकांनी फोन करुन मला सांगितलं की, रामदास कदम यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेत सुनील तटकरे यांचं नाव जोडलं आहे. माझं एकच मत आहे की, अजित पवार यांच्या अपघाताचा घटनेचा तपास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याप्रमाणे होत नाही", असा आरोप रोहित पवार यांनी केला.




"अजित पवार यांच्या अपघाताबाबत आम्हाला घातपाताची शंका आहे. पण सत्तेत असणारी लोकं त्या शंकेचं निरसन करत नाही. तपास योग्य दिशेने जात नाही. अजित दादांचा तपास संत गतीने सुरु आहे. त्यामुळे याबाबतीत आम्हालाही शंका वाटायला लागली आहे. सत्ताधारी लोकंच मुद्दामून योग्य पद्धतीने तपास करत नाहीत. तरीसुद्धा एकदा दिवाळी होऊ द्या. 14 किंवा 15 नोव्हेंबरला मुंबईत आता शेवटचं आणि महत्त्वाचं अनेक दिवसांचं माझं प्रेझेन्टेशन राहिलेलं आहे ते घेईन. त्याबाबतीत मी जो खुलासा करणार आहे त्या आपल्यासाठी नक्कीच आश्चर्याचा असणार आहे", असं मोठं वक्तव्य रोहित पवारांनी केलं.




रोहित पवारांकडून शंका व्यक्त"महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेबाबत शंका आहे. 90 टक्के लोकांना अजितदादांचा अपघात नसून घातपात झाल्याचा शंका आहे. आमचंसुद्धा तेच मत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात या प्रकरणात एफआयआर होत नसेल तर अजितदादांच्या अपघातात जो जबाबदार आहे त्याला सत्ताधारीच वाचवत आहेत", असा आरोप रोहित पवारांनी केला.




विलीनीकरणाच्या प्रश्नावर रोहित पवार काय म्हणाले?"विलीनीकरणाची चर्चा असती तर माझ्याशी खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील बोलले असते. या महाराष्ट्रात भाजप विरोधात आणि सत्ताधाऱ्यांविरोधात सगळ्यात जास्त लोकांच्याबाजूने आणि महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी मी बोलतोय. माझ्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. विलीनीकरणाची चर्चा फक्त अजितदादांच्या पक्षात आहे. माध्यमांमध्ये आहे. पण आमच्या पक्षात कुठेही चर्चा नाही", असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं.




रोहित पवारांचे रामदास कदमांना आवाहन"अजितदादांचा अपघात झाला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र धक्क्यात होता. पण अजित दादांच्या पक्षातून दोनच नेते सातत्याने राजकीय वक्तव्य करत होते. कर्जतचे आमदार असतील किंवा शिवसेनेचे नेते रामदास कदम असतील ते सत्ताधारी आहेत. सत्ताधारी असल्यामुळे त्यांच्या कानावर काही माहिती आली आहे का? त्यांच्यापर्यंत वेगळी काही माहिती पोहचली आहे का? त्या अनुषंगाने ते अशा काही नेत्यांचे नाव घेत आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की, फक्त नाव घेऊ नका. पुरावे असतील तर तेदेखील समोर आणा. त्या पुराव्यांचा नक्कीच अजित पवार आणि आम्हा सर्वांना न्याय देण्यासाठी प्रयत्न होईल", असं आवाहन रोहित पवारांनी केलं.




रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांवर निशाणा"आता 10 तारीख उद्याच आहे. प्रफुल्ल पटेल उद्या शरद पवारांना भेटतात का ते बघा. मला वाटत नाही की ते भेटतील. मुद्दा एवढाच आहे की, तुम्ही शरद पवारांना भेटायला कशासाठी गेला होता, तब्येतीची विचारपूस गेला होता? तिथे बसून तुम्ही तुमच्या पीएच्या मोबाईलवरुन व्हिडीओ काढता आणि तो बाहेर पाठवता. हे कितपत योग्य आहे? त्यामुळे कदाचित तुमचा हेतू शरद पवारांच्या आरोग्याची विचारपूस करण्याचा नव्हता तर फक्त तुमच्या पक्षामध्ये गोंधळ निर्माण व्हावा, सुनेत्रा पवारांवर दबाव निर्माण व्हावा हे दाखवण्यासाठी तुम्ही शरद पवारांना भेटला का? असादेखील प्रश्न निर्माण होतो", असं रोहित पवार म्हणाले.




रोहित पवारांचा पटेल-तटकरेंवर गंभीर आरोप"अजितदादांचा अपघात झाला त्यावेळेस प्रफुल्ल पटेल आणि काय म्हणत होते की, विलीनीकरणावर कुठेही चर्चा झालेली नाही. पण तुम्हा सर्वांना माहिती आहे, पहिले अधिवेशन मुंबईत होतं तेव्हा मी पुरावा दाखवला होता. त्या पुराव्यात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल चोरुन पक्षावर ताबा घेण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे कुठे ना कुठे, या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद या दोन नेत्यांपैकी एकाला घ्यायचं होतं. त्यामुळे ते पक्ष चोरत होते. पण त्यांचा प्रयत्न फसला कारण आम्ही पुरावा दाखवले", असा दावा रोहित पवारांनी केला.




"अजित दादा गेल्यानंतर राजकीय वक्तव्ये केले होते ते आता फिरवलं आहे. त्यांच्या पक्षात त्या दोन नेत्यांचं काही चालतं असं मला वाटत नाही. त्यांची गळचेपी होत असल्याने आता ते वक्तव्य फिरवले असेल. पण खरं त्यांच्या तोंडून आता निघालं", असा टोला लगावला.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.