रेशन दुकानातून सवलतीच्या दरात मिळणारे धान्य सुरळीत सुरू ठेवण्यासाठी रेशन कार्ड आणि आधार कार्डची जोडणी आवश्यक आहे. कुटुंबातील कोणत्या सदस्याचे आधार लिंक झाले आहे आणि कोणाचे नाही, याची लाइव्ह माहिती आता केवळ आधार किंवा रेशन कार्ड नंबरचा वापर करून ऑनलाईन पोर्टलवर अगदी मिनिटांत पाहता येते.
तुमचे रेशन कार्ड अद्याप आधारशी लिंक नसेल, तर तुमचे रेशन बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आधार लिंक आहे की नाही, हे वेळीच तपासा. ही तपासणी आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कशी करायची, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
ऑनलाईन स्टेटस तपासण्याच्या 2 पद्धती 1. 'मेरा रेशन' मोबाईल ॲपद्वारे
- सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Mera Ration App डाउनलोड करा.
- ॲप सुरू केल्यानंतर मुख्य स्क्रीनवर अनेक पर्याय दिसतील, त्यापैकी 'Aadhaar Seeding' या पर्यायावर क्लिक करा.
- आता स्क्रीनवर 'Ration Card Number' किंवा 'Aadhaar Number' मिळतील. त्यातील 'Aadhaar Number' हा पर्याय निवडा आणि तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाईप करा.
- 'Submit' बटणावर क्लिक करताच तुमच्या रेशन कार्डची संपूर्ण माहिती स्क्रीनवर उपलब्ध होईल. यात कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे नाव आणि त्याच्या नावासमोर Aadhaar Seeding: YES किंवा NO असे लिहिलेले दिसेल. जर तिथे 'YES' असेल तर तुमचे आधार यशस्वीरित्या लिंक झाले आहे.
2. अन्न व नागरी पुरवठा पोर्टलद्वारे
- यासाठी राज्य शासनाच्या अधिकृत RCMS MahaFood Portal (rcms.mahafood.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्या.
- होम पेजवर असलेल्या 'Ration Card' या पर्यायावर क्लिक करून 'Know Your Ration Card' हा पर्याय निवडा.
- तुमचा रेशन कार्ड नंबर (RC Number) आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाकून सबमिट करा.
- यानंतर तुमच्या रेशन कार्ड मधील सर्व सदस्यांची नावे उघडतील, जिथे आधार लिंकचे (UID Status) लाइव्ह स्टेटस पाहता येईल.
आधार लिंक नसल्यास काय करावे?तपासणीदरम्यान कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावासमोर 'NO' येत असेल, तर तात्काळ लिंक करणे आवश्यक आहे. आधार लिंक करण्याची ऑनलाईन लिंक सध्या काही तांत्रिक कारणांमुळे मर्यादित असली, तरी ऑफलाईन पद्धत अत्यंत सोपी आहे. यासाठी रेशन कार्डची प्रत, कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार कार्डच्या झेरॉक्स प्रति आणि कुटुंब प्रमुखाच्या बँक पासबुकची झेरॉक्स घेऊन तुमच्या जवळच्या रेशन दुकानदाराकडे जावे. तिथे दुकानदार बायोमेट्रिक (ई-पॉस मशीनवर अंगठा घेऊन) पद्धतीने तुमचे आधार रेशन कार्डशी तात्काळ लिंक करून देईल. रेशन मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सर्व नागरिकांनी ही तपासणी लवकरात लवकर पूर्ण करावी.