श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात बुधवारी दुपारी सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कर्तव्यावर असलेल्या जवानांवर गोळीबार केला. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडल्याची माहिती सीआरपीएफनं दिली. हल्लेखोरांनी जवानांवर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.






दहशतवाद्यांच्या गोळीबारात सीआरपीएफचे 3 जवान जखमी झाले आहेत. दोघांना अनंतनाग जिल्ह्यातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. हल्ल्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी तातडीनं हालचाली सुरू केल्या. हल्ल्याची माहिती मिळताच शीघ्र कृती दलाचं पथक घटनास्थळी पोहोचलं.






सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. सर्च ऑपरेशनला वेग देण्यात आला आहे. परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे आणि त्यांना पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत.






सीआरपीएफनं दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हल्लेखोरांनी नाक्यावर तैनात असलेल्या जवानांना लक्ष्य केलं. जवानांवर गोळीबार करून दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला. सुरुवातीला दोन जवान जखमी झाल्याची माहिती देण्यात आली होती. पण त्यानंतर तीन जवानांना रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.






सीआरपीएफचे जवान राकेश दास यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. संतोष चंद्रू यांच्या पोटात आणि पाठीच्या कण्याला गोळी लागली आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. तर सोमवीर सिंह यांच्या डाव्या हाताला गोळी लागली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.






याच महिन्याच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरच्या बांदिपोरामध्ये पोलिसांनी निर्बंध घातलेल्या इत्तेहाद-उल-मुस्लिमीनशी संबंधित फुटिरतावादी आणि दहशतवादी मॉड्युल प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली होती. संघटनेशी संबंधित एकूण आठ जणांना आतापर्यंत अटक झालेली आहे. याआधी सप्टेंबरमध्ये जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये जैशच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातलं होतं. सद्दाम आणि मुस्तफा अशी दोघांची नावं होती. दोघांकडे एके असॉल्ट रायफल, चार मॅगजीन, एम ४ कार्बाईन, ग्लॉक पिस्तुल आणि चार ग्रेनेड सापडले होते.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.