नवी दिल्ली : अहमदाबादमधील एका म्युझिक कॉन्सर्टसाठी अनिवासी भारतीयांसोबत (एनआरआय) जाण्यासाठी काही विद्यार्थिनींना पैसे, भेटवस्तू आणि इतर प्रलोभने दाखवल्याच्या आरोपाखाली दिल्ली विद्यापीठातील एका विद्यार्थ्याला निलंबित करण्यात आले आहे. या आरोपांच्या पुराव्यादाखल काही व्हॉट्सॲप चॅट्सचे स्क्रीनशॉट्स समोर आले आहेत. अनस खान असे विद्यार्थ्याचे नाव असून तो नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचा (एनएसयूआय) उपाध्यक्ष आहे.
काय आहेत आरोप?एका तक्रारीच्या आधारे रामानुजन कॉलेजच्या 'प्रॉक्टोरियल कमिटी'ने प्राथमिक चौकशी केली. या चौकशीनंतर, ६ नोव्हेंबर रोजी कॉलेज प्रशासनाने अनसला निलंबित केले. तक्रारीनुसार, त्याने विद्यार्थिनींना पैसे आणि इतर लाभांचे आमिष दाखवले. जाण्यासाठी एनआरआय व्यक्तींची साथ देण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे.
निलंबन आदेशानुसार, अनस खान याला १ फेब्रुवारी २०२७ पर्यंत नियमित शैक्षणिक आणि अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, या कालावधीत त्याला विद्यापीठाच्या नियोजित परीक्षांना बसण्याची मुभा देण्यात आली आहे.
'अनस खानशी एनएसयूआयचा संबंध नाही'या वादाच्या पार्श्वभूमीवर, 'नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया' (एनएसयूआय) ने या विद्यार्थ्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. संघटनेने सांगितले की, दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी युनियन (डीयूएसयू) निवडणुकांच्या दरम्यानच उपाध्यक्ष अनस खान याला संघटनेतून निलंबित करण्यात आले होते. दुसरीकडे, 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषद' (अभाविप) ने त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अभाविपच्या दिल्ली शाखेच्या म्हणण्यानुसार, समोर आलेल्या कथित व्हॉट्सॲप चॅट्समध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींना म्युझिक कॉन्सर्टला नेणे, प्रवासाची सोय करणे आणि आर्थिक लाभ देण्याबाबतच्या प्रस्तावांचा समावेश होता. ज्या विद्यार्थिनींशी संपर्क साधला गेला, त्या १७-१८ वर्ष वयोगटातील असल्याचे समजते.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, एनएसयूआयने या विद्यार्थ्याच्या वर्तनाचा निषेध केला. मात्र, त्यांनी पुन्हा स्पष्ट केले की, डीयूएसयू निवडणुकांदरम्यानच संघटनेविरोधी कारवाया आणि शिस्तभंगाच्या आरोपांमुळे अनस खानला संघटनेतून निलंबित करण्यात आले होते.
विद्यार्थी संघटनेने ठामपणे सांगितले की, जेव्हा हे नवीन आरोप समोर आले, तेव्हा अनसचा NSUI शी कोणताही संबंध नव्हता. संघटनेने असेही स्पष्ट केले की, त्याच्या वैयक्तिक कृतींचा संबंध संघटनेशी जोडू नये किंवा त्यासाठी संघटनेला जबाबदार धरु नये.
एनएसयूआयकडून चौकशीची मागणीNSUI चे राष्ट्रीय माध्यम प्रभारी रवी पांडे यांनी सांगितले की, "आमची संघटना नेहमीच विद्यार्थिनींची प्रतिष्ठा, सुरक्षा आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहिली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची आम्ही मागणी करत असून, दोषी आढळणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी" असेही ते म्हणाले.
अभाविपने देखील या आरोपांवर चिंता व्यक्त केली असून, या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि ठराविक कालमर्यादेत चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. यामध्ये तपासणीतून समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारे योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
अभाविपने २०१८ मध्ये फिरोज खान याच्याविरुद्धच्या लैंगिक छळाच्या आरोपांचाही मुद्दा उपस्थित केला. त्या काळात फिरोज खान एनएसयूआयचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत होता. या वादामुळे आणि काँग्रेस नेतृत्वाने सुरु केलेल्या चौकशीनंतर, त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.