मुंबई : कुर्ला (Mumbai) येथील हलाव पुलाजवळ झालेल्या गोळीबारात (Firing) विनोद मल्लपा पवार याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे विनोदचा भाऊ बाबा पवारची सहा महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र, आता दुसऱ्या भावाचाही मृत्यू झाल्याने पवार कुटुंब संतप्त झाले असून व्ही. बी. नगर पोलीस (Police) ठाण्यासमोर प्रचंड गोंधळ घालत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जुन्या वैमनस्यातून भरदिवसा गोळीबार करत कुर्ल्यात 40 वर्षीय विनोद यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 


ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता कुर्ल्यातही वर्चस्व वादातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हत्याकांडानंतर, मृताच्या पीडित कुटुंबाने ठिय्या आंदोलन सुरू केलं असून जोपर्यंत आरोपींना अटक होऊन कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी भूमिका मयतांचा कुटुंबाने घेतली आहे. 


मुंबईतील कुर्ल्यातील दोन गटांच्या वर्चस्वाचा लढाईमधून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यात विनोद पवार या व्यक्तीचा मृत्यू झाला. कुर्ला हलाव पूल जवळ ही घटना घडली. इथूनच काही अंतरावर माकडवाला कंपाऊंड आहे, इथे या दोन्ही टोळ्यांचे सदस्य राहतात, ते एकाच कुटुंबातील आहेत. मात्र, त्यांच्यातील वादातून वारंवार अशाप्रकारे हत्येचे प्रकार घडत आहेत. आज देखील तीन ते चार जणांनी विनोद पवारला हलाव पुलाजवळ गाठून त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून घटनास्थळी विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी, फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे, पुढील अधिक तपास सुरू आहे.


घटनास्थळावरुन बंदूक जप्त


दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून एक बंदूक जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या बंदुकीचे दृश्य (व्हिज्युअल्स) समोर आले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. गोळीबारामागील नेमके कारण काय आणि या घटनेत कोणाचा सहभाग आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास व्ही. बी. नगर पोलीस करत आहेत. या प्रकरणात आरोपींची ओळख पटवण्यासाठी आरोपी ज्या मार्गे आले आणि पळाले त्या ठिकाणचे सीसीटिव्ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तसेच घटनास्थळावरील 3 ते 4 प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवणे सुरु आहे. नेहल पवार याचा या गोळीबार करण्यामागे हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 



पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.