नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच त्यांची मुलगी हर्षिता केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी देणाऱ्या व्यक्तीने सात कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दिल्लीतील तिलक नगरचे आमदार जरनैल सिंह यांना धमकीचे फोन कॉल आणि व्हॉट्सॲप संदेश प्राप्त झाले. या संदेशांमधून केजरीवाल यांच्यापर्यंत धमकी पोहोचवण्यास सांगण्यात आले होते. यानंतर जरनैल सिंह यांनी ६ नोव्हेंबर रोजी मोहाली पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
आमदार जरनैल सिंह यांनी मोहालीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) यांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मोबाइल क्रमांकावर फोन आला आणि व्हॉट्सॲपवरही धमकीचे संदेश पाठवण्यात आले. व्हॉट्सॲपवरील संबंधित व्यक्तीच्या प्रोफाइलचे नाव ‘H’ असल्याचे सांगण्यात आले आहे.
फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे सांगितले. अरविंद केजरीवाल यांना सात कोटी रुपये देण्यास सांगावे, अन्यथा त्यांना आणि त्यांच्या मुलीला ठार मारण्यात येईल, अशी धमकी दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
फोन कॉलनंतर त्याच मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सॲप संदेशही पाठवण्यात आले. त्यामध्ये सात कोटी रुपयांची मागणी आणि जीवे मारण्याची धमकी पुन्हा देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणाचा तपास सायबर क्राइम पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुमार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
संबंधित मोबाइल क्रमांकाचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), आयपी लॉग आणि लोकेशन ट्रेस करण्याची मागणी आमदार जरनैल सिंह यांनी केली आहे. तसेच अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
धमकी देणारी व्यक्ती हरियाणातील रोहतक येथील रहिवासी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या माहितीला पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
अरविंद केजरीवाल यांना यापूर्वीही जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना घडली होती. मे २०२४ मध्ये दिल्ली मेट्रोच्या डब्यात धमकीचे संदेश लिहिल्याचे समोर आले होते. त्या वेळीही त्यांच्या जीवाला धोका असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नव्या धमकीच्या प्रकरणामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्याच्या प्रकरणात धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख, खंडणी मागण्यामागील उद्देश आणि कथित गँगशी असलेला संबंध याबाबत तपासातून पुढील माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.