भोपाळ: एका तरुणाला त्याच्या ओळखीच्या व्यक्तीनं रसगुल्ला सांगून क्रूड बॉम्ब खाऊ घातला. तरुणानं फार विचार न करता रसगुल्ला तोंडात टाकला. रसगुल्ला दातांखाली येताच जोरदार स्फोट झाला. या स्फोटात तरुणाच्या जबड्याला गंभीर स्वरुपाची इजा झाली. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेशच्या डिंडोरी जिल्ह्यात ही घटना घडली.
डिंडोरी जिल्ह्यातील पडरिया छांटा गावात राहणाऱ्या ३५ वर्षीय राजेंद्र बरौतिया यांचा स्फोटात मृत्यू झाला. स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी दुर्गा प्रसाद नगपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र यांनी मंगळवारी संध्याकाळी कुटुंबासोबत जेवण केलं होतं. त्यानंतर ते घराच्या अंगणात बसले होते. रात्रीच्या आठच्या सुमारास गावातच राहणारा रामभगत बरौतिया तिथे पोहोचला. दोघांमध्ये गप्पा रंगल्या. याच दरम्यान रामभगतनं राजेंद्र यांच्या हातावर रसगुल्ला ठेवला. या रसगुल्ल्यात क्रूड बॉम्ब होता. याची पुसटशीही कल्पना राजेंद्र यांना नव्हती. त्यांनी मिठाई समजून रसगुल्ला तोंडात टाकला.
राजेंद्र यांनी रसगुल्ला दाताखाली घेताच त्यात असलेल्या क्रूड बॉम्बचा स्फोट झाला. राजेंद्र यांच्या तोंडात स्फोट झाल्यानं त्यांच्या जबड्याला भीषण स्वरुपाची दुखापत झाली. अचानक झालेल्या स्फोटानं राजेंद्र यांच्या घरातले आणि शेजारचे लोक घाबरले. राजेंद्र यांना रक्तबंबाळ अवस्थेत पाहताच कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र यांना रिक्षानं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. पण त्यांची प्रकृती अतिशय नाजूक होती. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करुनही त्यांचा जीव वाचू शकला नाही. राजेंद्र यांच्या मृत्यूनं गावावर शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर राजेंद्र यांचं शव पोस्टमॉर्टमला पाठवलं. पोलिसांनी रामभगत बरौतियाच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि स्फोटक अधिनियमच्या कलम ३ आणि ४ च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपी सध्या फरार आहे. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. क्रूड बॉम्ब आरोपीकडून कुठून आला आणि त्यानं तो राजेंद्रला रसगुल्ला सांगून का दिला, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.