Tulsi Vivah Importance : दिवाळीचे महत्त्वाचे चार दिवस संपले की चाहुल लागते ती तुळशी विवाहाची! हिंदू धर्मातील आणखी एका मंगल सोहळा. दिव्यांच्या प्रकाशात आणि आनंदाच्या वातावरणात साजऱ्या होणाऱ्या दिवाळीची सांगता तुळशी विवाहाने होते. सगळीकडे तुळशी विवाह मोठ्या उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असते आणि त्याचदिवशी तुळशीचे लग्न लावले जाते. तुळशी विवाहानंतर सर्व शुभ आणि मंगल कार्यांना सुरुवात होते म्हणून तर आपल्या संस्कृतीत तुळशी विवाह फार महत्त्वाचा आहे.




तुळशी विवाह लग्नसराईचा शुभ संकेतधार्मिक मान्यतेनुसार, आषाढ शुक्ल एकादशीपासून योगनिद्रेत असलेले भगवान श्रीविष्णू कार्तिक शुक्ल एकादशीला जागृत होतात. त्यांच्या जागृत होण्याने चातुर्मासाची समाप्ती होते. विष्णूंच्या या जागृतीनिमित्त साजरा होणारा उत्सव प्रबोधनी उत्सव म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मशास्त्रात भगवान विष्णूंना सर्व शुभ आणि मंगल कार्यांचे अधिष्ठाता मानले जाते. त्यामुळे ते निद्रावस्थेत असलेल्या चातुर्मासाच्या काळात विवाहासह इतर मोठी शुभ कार्य होत नाहीत.




भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे झाल्यानंतरच विवाह, मुंज आणि गृहप्रवेश यांसारख्या मंगल कार्यांना प्रारंभ करण्याची परंपरा आहे. त्यामुळे तुळशी विवाह हा लग्नसराई सुरू होण्याचा शुभ संकेत मानला जातो. या सोहळ्यात भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या तुळशीचा विवाह लावला जातो. या प्रतीकात्मक विवाहामुळे मानवी विवाह सोहळ्यांचा मार्गही मोकळा होतो तसेच कन्यादान केल्याचे पुण्य मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे.




कसा साजरा केला जातो तुळशीचा विवाहसोहळा?तुळशी विवाहाच्या निमित्ताने तुळशी वृंदावन सजवण्याची विशेष लगबग पाहायला मिळते. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार आणि हौसेने तुळशीच्या रोपट्याची सजावट करतात. काही ठिकाणी तुळशीला सुंदर साडी नेसवून तिला लाल ओढणी (चुनरी) घालून सजवले जाते. पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडतो. गोरज मुहूर्तावर वराचे पूजन केले जाते. तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे.




तुळशी विवाहाची पौराणिक कथापौराणिक कथेनुसार, प्राचीन काळात जालंधर नावाचा एक राक्षस सर्वत्र उपद्रव माजवत होता. त्याच्या सामर्थ्यामागे त्याची पत्नी वृंदा हिचा पतीव्रता धर्म हे प्रमुख कारण होते. वृंदाच्या सतीत्वाच्या प्रभावामुळे जालंधर सर्वव्यापी झाला होता. त्याच्या वाढत्या अत्याचारांमुळे त्रस्त झालेल्या देवतांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली आणि त्यांच्याकडे संरक्षणाची विनंती केली. देवतांची प्रार्थना ऐकल्यानंतर भगवान विष्णूंनी वृंदेचा पतीव्रता धर्म भंग करण्याचा निर्णय घेतला.




वृंदेचे सतीत्व भंग झाल्यानंतर देवतांसोबत युद्ध करत असलेल्या जालंधराचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूची बातमी समजताच वृंदा संतप्त झाली. तिने भगवान विष्णूंना शाप दिला की, ज्या प्रकारे कपटाने तिचा पतीपासून वियोग घडवून आणला, त्याचप्रमाणे त्यांनाही पत्नीचा वियोग सहन करावा लागेल आणि त्यासाठी मृत्युलोकात जन्म घ्यावा लागेल. असा शाप दिल्यानंतर वृंदा आपल्या पतीसोबत सती गेली. ती ज्या ठिकाणी सती गेली, त्याच ठिकाणी तुळशीचे रोपटे निर्माण झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते.




वृंदाने भगवान विष्णूंना आणखी एक शाप दिला. माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल, असे ती म्हणाली. त्यानुसार भगवान विष्णू शालिग्राम शिळेच्या स्वरूपात प्रकट झाले. त्यावेळी विष्णूंनी वृंदेला सांगितले की, तिच्या पतीव्रता धर्माच्या पुण्यामुळे ती तुळशीच्या रूपात सदैव त्यांच्यासोबत राहील. तसेच, जो कोणी त्यांचा तुळशीसोबत विवाह लावेल, त्याला पुण्यप्राप्ती होईल. तेव्हापासून तुळशीशिवाय शालिग्राम किंवा भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाऊ लागली. म्हणूनच तुळशीच्या लग्नात शालिग्राम ठेवला जातो.भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी यांच्या विवाहाचे प्रतीक म्हणजेच तुळशी आणि शालिग्राम यांचा विवाह असे म्हणतात.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.