स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) महाबळेश्वरमधील आठ मोठय़ा हॉटेल आस्थापनांवर कारवाई केली आहे. यापैकी हॉटेल इव्हरशाईन (महाबळेश्वर), हॉटेल रामसुख (क्षेत्र महाबळेश्वर) आणि हॉटेल ब्राईटलॅण्ड (नाकिंदा) या तीन हॉटेलच्या अन्नविक्रीचे परवाने निलंबिन करण्यात आले आहेत. तर अन्य पाच हॉटेल्सना नोटिसा बजावून त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, ही कारवाई ऐन दिवाळीच्या पर्यटन हंगामात झाल्याने हॉटेलमध्ये आगाऊ आरक्षण केलेल्या पर्यटकांची गैरसोय झाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएच्या पथकाने शहरातील विविध हॉटेलचे किचन आणि रेस्टॉरंटची तपासणी केली. या तपासणीत गंभीर स्वरूपाच्या बाबी आढळल्या नसल्या, तरी स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तीन हॉटेलच्या रेस्टॉरंटचे अन्नविक्री परवाने काही दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याने त्यांचे खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवहार बंद ठेवावे लागले आहेत. या कारवाईमुळे पर्यटकांना ऐनवेळी पर्यायी हॉटेल शोधण्यासाठी धावपळ करावी लागली.