महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह ब्रिटनचा राजकुमार विल्यम आणिराजकुमारी केट मिडलटन यांनी सोमवारी मुंबईत गल्ली क्रिकेटचा आनंद लुटला. यावेळी राजकुमार विल्यम यांना एका चिरमुरडीने क्लीन बोल्ड केल्याचेही पाहायला मिळाले. सचिननेही आपल्या नजातकभऱ्या शैलीने फटकेबाजी करत सर्वांची मने जिंकली.
राजकुमार विल्यम आणि राजकुमारी केट हे तीन दिवसांच्या हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आले आहेत. ‘अर्थशॉट प्राईज’ या वार्षिक पुरस्काराला उपस्थित राहण्यासाठी हे दोघेही मुंबईत दाखल झाले. मुंबईतील बॅलार्ड इस्टेट या भागात सचिनने विल्यम आणि केट यांची भेट घेतली. सचिन यावेळी प्रिन्स विल्यमला क्रिकेटबद्दल समजावून सांगताना दिसला.
या गल्ली क्रिकेटमध्ये प्रिन्स प्रथम फलंदाजीसाठी उतरले आणि त्यांनी काही वेळ चांगली फलंदाजी केली; पण त्यानंतर एका चिमुरडीने प्रिन्स विल्यम यांना क्लीन बोल्ड केले; पण यावेळी बाद झाल्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्यानंतर सचिन फलंदाजीसाठी मैदानात उतरला. सुरुवातीला सचिनच्या ऑन-ड्राइव्ह शॉटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर सचिनला गोलंदाजी करण्यासाठी प्रिन्स विल्यम सरसावले. सचिनने त्यांच्या गोलंदाजीवर सरळ रेषेत फटका मारला आणि जोरदार टाळय़ांचा वर्षाव झाला.
‘आम्ही 10 वर्षांपूर्वी क्रिकेट खेळण्यासाठी भेटलो होतो. तेव्हा मी म्हणालो होतो की, आपण आता मैदानावर क्रिकेट खेळत आहोत, पण पुढच्या वेळी आपण गल्ली क्रिकेट खेळू आणि मग प्रिन्स विल्यम येऊन आमच्यात सामील झाले. असे सचिनने या भेटीनंतर सांगितले.