मुंबईच्या रुग्णालयीन क्रिकेटविश्वात आता चौकार-षटकारांची आतषबाजी रंगणार आहे. तब्बल 33 वर्षांची परंपरा लाभलेल्या प्रतिष्ठेच्या गिरनार चहा पुरस्कृत आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेचा थरार 18 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मुंबईतील 16 नामांकित रुग्णालयांचे संघ एलिट आणि प्लेट अशा दोन गटांत विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत. ब्रीच कँडी आणि कोकिळाबेन अंबानी यांच्यातील एलिट गटाच्या सलामीच्या लढतीने स्पर्धेचा बिगुल वाजणार आहे
हिंदुजा-टाटा रुग्णालयाच्या पुढाकारातून 1994 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेने रुग्णालयीन क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. मिलिंद सावंत आणि डॉ. हुमायूं जाफरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेचा मुख्य उद्देश क्रिकेटपटूंना संधी आणि रोजगाराचे दालन खुले करणे हा होता.
एलिट गटात नानावटी, हिंदुजा, टाटा, जे. जे., केईएम, जसलोक, ब्रीच कँडी आणि कोकिळाबेन अंबानी यांच्यात चुरस रंगेल. प्लेट गटात बॉम्बे, हिरानंदानी, रहेजा, लोकमान्य टिळक, कस्तुरबा, लीलावती आणि ग्लेन ईगल्स हे संघ ताकद आजमावतील. या स्पर्धेने नंदू पाटील, अविनाश जाधव, जीतेंद्र परदेशी, ओंकार जाधव, श्रीकांत दुधवडकर आणि प्रदीप क्षीरसागर यांच्यासारखे क्रिकेटपटू मुंबई क्रिकेटला दिले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबमध्ये मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव डॉ. उन्मेष खानविलकर, कोषाध्यक्ष अरमान मलिक यांच्या उपस्थितीत होणार असून, यावेळी सर्व संघांना किटचे वाटप केले जाणार आहे.