इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे बंद करुन निवडणुका पुन्हा कागदी मतपत्रिकांवर घ्या, असा घोषा सध्या भारतातील विरोधी पक्षांनी लावला आहे. अर्थात, ज्या निवडणुकांमध्ये अशा कागदी मतपत्रिका असतानाही त्यांचा बहुतेकवेळी पराभवच झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. तरीही हा आग्रह धरला जात आहे. ज्या निवडणुकांमध्ये मतपत्रिका कागदी आहेत, त्यांच्या संबंधांमधील गमतीजमतीही समोर येत आहेत. राजस्थान राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया होत आहे. या निवडणुका कागदी मतत्रिकांवर होत आहेत. या राज्यातील सवाई माधवपूर जिल्ह्यातील सूरवाल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील ही घटना आहे. सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत एकंदर 43 उमेदवारांनी अर्ज सादर पेले होते. उमेदवारांची संख्या अधिक असल्याने निवडणूक चिन्हेही कमी पडू लागली. त्यामुळे नवी निवडणूक चिन्हे राज्य निवडणूक आयोगाला निर्माण करावी लागली.
हे प्रकरण एव्हढ्यावरच थांबत नाही. 43 उमेदवार ही निवडणूक लढविण्यासाठी पात्र ठरल्याने मतपत्रिकाही तितकीच मोठी छापावी लागली. तिची लांबी तब्बल 5 फूट झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हा भारतातील मतपत्रिकेच्या लांबीचा विक्रम असण्याची शक्यता आहे. उमेदवारांची संख्या मोठी असणे नवे नाही. पण अशावेळी मतपत्रिकेच्या स्थानी ‘मतपुस्तिका’ मुद्रित केली जाते. याचा अर्थ असा की, 10-10 नावांच्या कागदांचा संच मतपत्रिका म्हणून उपयोगात आणला जातो. सरपंचपदासाठी एकंदर 55 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. पण छाननीनंतर 43 उमेदवार पात्र ठरले. सगळे 55 उमेदवार पात्र ठरले असते, तर मतपत्रिका आणखी लांबलचक झाली असती. या गावात 6,566 मतदार आहेत. येथे 16 नोव्हेंबरला मतदान पार पडले आहे. निवडणूक चिन्हे कमी पडल्याने तक्क्या, नाव, बाक अशा चिन्हांचा उपयोग करण्यात आला. यासाठी राज्य निवडणूक आयोगाची विशेष अनुमती स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांना घ्यावी लागली. ही सरपंच पदाची निवडणूक मतपत्रिकेच्या लांबीमुळे गाजली असून ती बराच काळ स्मरणात राहील, असे स्थानिक नागरीकांचे म्हणणे आहे. तसेच ही मतपत्रिका घडी करुन मतपेटीत टाकताना मतदारांनाही बरीच कसरत करावी लागली, असे नेतेमंडळींनी स्पष्ट केले
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.