देहरादून: उत्तराखंडच्या टिहरी गढवाल जिल्ह्यात मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. हरिद्वारहून चमोलीला जाणारी प्रवासी बस गुलर बाजार जवळ अनियंत्रित होऊन १०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमध्ये ३० ते ३५ जण होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चालक भरधाव वेगात बस चालवत होता. प्रवाशांनी त्याला बसचा वेग कमी करण्याची विनंती दोन-तीनदा केली होती. पण चालकानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचं एका जखमी प्रवाशानं सांगितलं.
बस अतिशय वेगात होती, असं अपघातात जखमी झालेले प्रवासी पंकज यांनी सांगितलं. 'बस चालकाला वेग कमी करण्याची विनंती केली होती. अन्य प्रवाशांनीदेखील त्याला दोन-तीन वेळा वेग कमी करण्यास सांगितलं होतं. पण त्यानं कोणाचंही ऐकलं नाही. तो भरधाव वेगात बस चालवत राहिला. मग काही वेळानं मला झोप लागली. अपघात झाला तेव्हा मी झोपेतच होतो. त्यामुळे अपघात नेमका कसा झाला, ते मला कळलं नाही,' असं पंकज यांनी सांगितलं.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार, बस हरिद्वारहून चमोलीला जात होती. मंगळवारी पहाटे साडे चारच्या सुमारास गुलर पुलाजवळ चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. यानंतर बस जवळपास १०० मीटर खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांची पथकं दुर्घटनास्थळी पोहोचली. त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केलं. बसमध्ये अडकलेल्या २६ प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. दुर्गम रस्ता असल्यानं जवानांनी स्ट्रेचरच्या मदतीनं दरीतून रस्त्यापर्यंत पोहोचवलं. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आलं. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ८ प्रवाशांचे शव बसमधून काढून रस्त्यापर्यंत आणण्यात आले आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं.
अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णवाहिकेतून एम्स ऋषिकेशसह अन्य रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. एम्सचे जनसंपर्क अधिकारी शिलोय यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात २२ रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. ट्रॉमा टीमसह अन्य विभागांमधील डॉक्टर जखमींवर उपचार करत आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.