निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांची बँक गृहीत धरली जायची. मात्र आता जिल्हा सहकारी बँकेत घराणेशाही उदयास येते की काय असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या माघारीचा आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी 21 पैकी तब्बल 12 जागा या बिनविरोध निवडून आल्याने जिल्हा बँकेत घराणेशाहीचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसत आहे. जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये आज 229 अर्जांपैकी 200 जणांनी माघार घेतली. यात 29 जण निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत. विशेषतः मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटीमधून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कोणकोण बिनविरोध निवडून आले?बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारी, माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री अनिल पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील, आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल पाटील आणि आई नलीनी चिमणराव पाटील, राज्यसभेचे खासदार उज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांच्यासह दिग्गजांच्या जागा या नेत्यांनी बिनविरोध करून घेतल्या. मात्र रक्षा खडसे यांची जागा बिनविरोध करण्यात भाजपला या ठिकाणी मोठे अपयश आले. रक्षा खडसे या निवडणुकीला सामोरे जायला तयार आहेत.
रक्षा खडसे यांच्या विरोधात कोण?केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थक देवयानी देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर विनोद तराळ आणि योगेश कोलते यांनी माघार घेतल्याने रक्षा खडसे आणि देवयानी देशमुख यांचे दोन अर्ज दाखल राहिले असल्याने दोघांमध्ये निवडणूक होणार आहे.
शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही खडसेमुक्त बँक करणार अशी भूमिका घेत शड्डू ठोकला होता. त्यामुळे मुक्ताईनगरची जागा ही शिवसेनेला सुटावी यासाठी चंद्रकांत पाटील हे आग्रही होते. दुसरीकडे ही जागा भाजपला सुटावी यासाठी भाजपचे कुठेही प्रयत्न दिसून आले नसल्याची चर्चा देखील सुरू आहे. रक्षा खडसे यांच्या उमेदवाराला आधीपासूनच विरोध होता. त्यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरावा म्हणून हरकत घेण्यात आली होती. मात्र छाननीवेळी रक्षा खडसे यांचा अर्ज वैध ठरला होता.
मंत्री गिरीश महाजनांचे अपयश?भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन स्वतः आले असले, तरी त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जाणारे मंगेश चव्हाण यांची जागा बिनविरोध करण्यात महाजन यांना अपयश आले आहे. मुक्ताईनगर आणि चाळीसगाव या दोन्ही महत्त्वाच्या मतदारसंघांत प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार न घेतल्याने आता तिथे थेट आणि चुरशीची लढत होणार आहे.
मंगेश चव्हाण यांनी यापूर्वी जळगाव जिल्हा दूध संघाची धुरा सांभाळल्यानंतर आता महायुतीच्या नियोजनाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. मात्र, स्वतःच्याच मतदारसंघात निवडणूक लागल्याने त्यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. एकंदरीतच या सर्व निवडणुकींचा विचार करता शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेली जेडीसी बँक आता घराणेशाहीने डोकेवर काढले आहे. दरम्यान, या निवडणुकीमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार एवढे मात्र निश्चित आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.