भोपाळ: ऐतिहासिक लालबाग पॅलेस मध्ये बांधकाम सुरू असताना जमिनीखाली एक प्राचीन तिजोरी सापडली . रस्त्याच्या कामासाठी खोदकाम केलं जात असताना अचानक तिजोरी समोर आल्यानं तिथे असलेले कर्मचारीही चकित झाले. तिजोरी तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली. आता या तिजोरीबद्दल विविध चर्चा सुरू आहेत. तिजोरी राजघराण्याच्या काळातील आहे का, त्यात कधी काळी सोनं, चांदी किंवा अन्य मौल्यवान वस्तू ठेवल्या जायच्या का, सध्या या तिजोरीत काय आहे, अशा विविध चर्चा सध्या लोकांमध्ये सुरू आहे. लालबाग पॅलेस मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्ह्यात येतो. इंदूरला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळेच तिजोरीबद्दल लोकांना उत्सुकता आहे.
लालबाग पॅलेसमध्ये सध्या बांधकाम आणि दुरूस्तीचं काम सुरू आहे. रस्ता आणि भिंतींचं काम करण्यासाठी जमीन खणली जात होती. नेहमीप्रमाणे काम सुरू होतं. तितक्यात कर्मचाऱ्यांना जमिनीच्या खाली एक जुनी वस्तू दिसली. कामगारांनी ती वस्तू बाहेर काढली. ही वस्तू तिजोरी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तिजोरी समोर येताच ती पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी जमली.
तिजोरी सापडल्याची माहिती कामगारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी तातडीनं तिजोरी सुरक्षित स्थळी हलवली. खोदकाम, बांधकामाच्या दरम्यान तिजोरीचं नुकसान होऊ नये याची काळजी अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. तिजोरी उघडण्यात आल्याची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही. अधिकाऱ्यांच्या निरीक्षणानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
होळकर राजघराण्याशी संबंधित इतिहास?
इंदूरचा लालबाग पॅलेस होळकर राजघराण्याचा इतिहास आणि वारशाशी संबंधित प्रमुख ठिकाण आहे. याच भागात तिजोरी सापडल्यानं लोकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे. या तिजोरीचा संबंध होळकर राजघराण्याशी आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तिजोरीचा वापर राजघराण्यातील कोणी केला होता का, या तिजोरीचा वापर महत्त्वाची कागदपत्रं, दागिने, रोख किंवा अन्य मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी केला जायचा का, या प्रश्नांची उत्तरं अद्याप सापडलेली नाहीत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.