दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आणि शरीराला नव्याने ऊर्जा मिळण्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, अनेकांना रात्री अंथरुणावर गेल्यानंतरही लवकर झोप लागत नाही. काहींची झोप वारंवार मोडते, तर काही जण सकाळी उठल्यानंतरही फ्रेश वाटत नसल्याची तक्रार करतात. यामागे केवळ कामाचा ताण किंवा शारीरिक थकवा कारणीभूत नसतो, तर आपल्या रोजच्या काही सवयीही याला जबाबदार असू शकतात. दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणे, चहा-कॉफी पिणे किंवा दुसऱ्या दिवसाच्या कामांचे नियोजन करत बसणे यामुळे मेंदूला शांत होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी शरीराला विश्रांतीची गरज असतानाही मन सक्रिय राहते. आपल्या शरीरात एक नैसर्गिक जैविक घड्याळ असते, जे झोपण्याची आणि जागे होण्याची वेळ नियंत्रित करते. या चक्रात वारंवार बदल झाल्यास झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. चांगल्या झोपेसाठी शरीरातील विविध नैसर्गिक प्रक्रियांमध्ये योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. त्यामुळे रात्रीच्या दिनचर्येकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्हालाही शांत आणि गाढ झोप हवी असेल, तर झोपण्यापूर्वीच्या या पाच सवयींकडे लक्ष द्या. आजकाल अनेकांची सवय असते की, झोपण्यापूर्वी एकदा मोबाईल पाहायचा आणि त्यानंतर सोशल मीडियावर स्क्रोल करत बराच वेळ घालवायचा. मेसेज तपासणे, व्हिडीओ पाहणे किंवा सतत नोटिफिकेशन्स पाहणे यामुळे मेंदू अधिक सक्रिय राहतो. मोबाईलच्या स्क्रीनमधून येणारा प्रकाश शरीरातील मेलाटोनिन या झोपेशी संबंधित संप्रेरकाच्या निर्मितीवर परिणाम करू शकतो. त्यामुळे झोप येण्यास विलंब होण्याची शक्यता असते. ही सवय बदलण्यासाठी झोपण्याच्या किमान ३० मिनिटे आधी मोबाईल बाजूला ठेवा. त्याऐवजी पुस्तक वाचा, शांत संगीत ऐका किंवा काही मिनिटे श्वसनाचे व्यायाम करा. फोनवरील अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद ठेवल्यास वारंवार स्क्रीन पाहण्याची इच्छाही कमी होऊ शकते. रात्री झोपण्याच्या अगदी आधी पोटभर जेवणे किंवा जड पदार्थ खाणे टाळावे. विशेषतः तेलकट, मसालेदार आणि जास्त प्रमाणातील अन्नामुळे अपचन, पोट जड होणे किंवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. यामुळे झोपताना अस्वस्थता जाणवू शकते. त्याचप्रमाणे मद्यपान केल्याने सुरुवातीला झोप लवकर लागल्यासारखे वाटू शकते; मात्र रात्रीच्या पुढील टप्प्यांमध्ये झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि वारंवार जाग येऊ शकते. त्यामुळे झोपण्याच्या साधारण दोन ते तीन तास आधी रात्रीचे जेवण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. रात्री भूक लागल्यास जड पदार्थांऐवजी हलका नाश्ता निवडा. चांगल्या झोपेसाठी मद्यपान टाळणे अधिक योग्य आहे. कधी रात्री लवकर झोपणे, तर कधी मध्यरात्रीपर्यंत जागे राहणे अशी दिनचर्या असल्यास शरीराच्या नैसर्गिक झोप-जागे होण्याच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो. आपल्या शरीरातील सर्केडियन रिदम म्हणजेच जैविक घड्याळ दिवस आणि रात्रीच्या चक्रानुसार काम करते. दररोज झोपण्याची आणि उठण्याची वेळ बदलल्यास या घड्याळाचा समतोल बिघडू शकतो. विशेषतः सुट्टीच्या दिवशी खूप उशिरापर्यंत झोपणे आणि इतर दिवशी लवकर उठणे ही सवय टाळावी. दररोज शक्यतो एकाच वेळी झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा. सकाळी नैसर्गिक सूर्यप्रकाशात काही वेळ घालवणेही शरीराचे जैविक घड्याळ नियमित ठेवण्यास मदत करू शकते. बहुतेक प्रौढ व्यक्तींना दररोज साधारण सात ते नऊ तास झोपेची आवश्यकता असते. कधीतरी झोप न लागणे किंवा रात्री झोपमोड होणे सामान्य असू शकते. मात्र, नियमित दिनचर्येत बदल करूनही झोपेचा त्रास कायम राहत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. मोठ्याने घोरणे, झोपेत श्वास घेण्यास अडथळा येणे, अचानक धाप लागून जाग येणे, पाय सतत हलवण्याची इच्छा होणे किंवा दिवसा अतिप्रमाणात झोप येणे ही काही महत्त्वाची लक्षणे असू शकतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. विशेषतः अपस्मार किंवा मज्जासंस्थेशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तींनी झोपेच्या समस्यांकडे अधिक गांभीर्याने पाहावे. कारण अपुऱ्या झोपेमुळे काही रुग्णांमध्ये झटक्यांचा धोका वाढू शकतो.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.