सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील हर्सूल कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या आवारातील 'ड्राय वेस्ट' (सुका कचरा) शेडला बुधवारी पहाटे सव्वाचार ते साडेचार वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. सुमारे १५ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या या शेडमध्ये आग भडकल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तब्बल चार तास शर्थीची झुंज देत आगीवर नियंत्रण मिळवल्याने परिसरातील मोठा अनर्थ टळला. या घटनेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सखोल चौकशी करून संबंधित एजन्सीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.




कोट्यवधी रुपयांचे नुकसानमहापालिकेच्या वतीने शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हर्सूल येथे उभारलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास बुधवारी पहाटे आग लागली. आगीत २५०० मेट्रिक टन कचरा जळून खाक झाला. १५ हजार चौरसफुटाचे शेड, दोन मशीनही भस्मसात झाल्या. कोट्यवधींचे नुकसान झाल्याप्रकरणी तपासणी करून दोषींवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. मात्र नुसती जबाबदारी निश्चित होणार की प्रत्यक्ष काय कारवाई होणार ? हा मोठा प्रश्न आहे.




नेमकं काय-काय नुकसान झालं?हर्सूल कचरा प्रक्रिया प्रकल्पास ड्रायवेस्ट (कोरडा कचरा) भागाला बुधवारी पहाटे आग लागली. बेलिंग, प्रोसेसिंग मशीन आगीत जळून खाक झाल्या. पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान पहाटेपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. प्रकल्प परिसरात एसटीपी प्रकल्पातून घेतलेले ७५ लाख लिटर पाणी फायर सेफ्टीसाठी ठेवलेले होते. शिवाय प्रकल्पाची यंत्रणाही होती.




हर्सूल प्रकल्पातील सुमारे १५,००० चौरस फूट क्षेत्रफळाच्या या शेडमध्ये सिमेंट फॅक्टरीत पाठवण्यासाठी प्रक्रिया करून सुका कचरा (ड्राय वेस्ट) साठवून ठेवण्यात आला होता. पहाटे सव्वाचारच्या सुमारास या शेडमध्ये अचानक आग भडकली. घटनेची माहिती मिळताच घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने तातडीने सूत्रे हलवली.




अग्निशमन दलाच्या ४ बंबांनी आणि पाण्याच्या टँकर्सनी घटनास्थळी धाव घेत आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. कर्मचाऱ्यांच्या चार तासांच्या अथक प्रयत्नांमुळे आग इतरत्र पसरण्यापूर्वीच रोखली गेली आणि सकाळी ९ वाजेपर्यंत ती पूर्णपणे नियंत्रणात आली. दिवसभरात धूर शमवून संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात आला.




आयुक्तांकडून पाहणी; एजन्सीवर कारवाईचे आदेशघटनेची माहिती मिळताच अमोल येडगे आणि उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) नंदकिशोर भोंबे यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच महापौर, उपमहापौर आणि सभापती यांनी दूरध्वनीवरून परिस्थितीचा आढावा घेत यंत्रणेला सूचना दिल्या. आयुक्तांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अग्निशमन उपाययोजना अधिक बळकट करण्याचे निर्देश दिले आहेत.




या संपूर्ण प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून सविस्तर चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश उपायुक्त भोंबे यांना दिले असून, प्रकल्पात काम करणाऱ्या 'मायो एस.एस.' या एजन्सीची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. सध्या डेपोतील ओल्या कचऱ्याचे प्रोसेसिंग युनिट पूर्णपणे सुरळीत सुरू आहे.




दरम्यान, एखादी मोठी घटना घडल्यानंतर त्याची चौकशी करून अहवाल मागविला जातो. दोषींवर जबाबदारी निश्चित करून कारवाईचे आश्वासन दिले जाते. या प्रकरणातही असेच होणार की कारवाई होणार हा प्रश्न आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.