म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सायबरसुरक्षेचा धोका, विखुरलेले भांडवली व्यवहार आणि गुंतवणूकदारांचा फारसा उत्साह नसणे यामुळे शेअर बाजार अहोरात्र सुरू ठेवून 24 तास ट्रेडिंगकडे वाटचाल करण्याची तत्काळ कोणतीही योजना नाही, असे भांडवल बाजार नियामक सेबीचे अध्यक्ष तुहिनकांत पांडे यांनी बुधवारी स्पष्ट केले. वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्स्चेंजेसच्या (WFE) 65 वी महासभा आणि वार्षिक बैठक या कार्यक्रमात पांडे बोलत होते.
शेअर बाजारात 24 तास ट्रेडिंग करता येणार?अहोरात्र किंवा 24 तास ट्रेडिंगसाठी जाताना आपण का करावे, त्याचे खर्च काय आहेत आणि त्याचे धोके काय आहेत, याचे अतिशय सक्षम कारण आपल्याकडे असले पाहिजे. कशी हाताळली जाईल हे सध्या कोणालाच माहीत नाही. अमेरिकेत यासंदर्भात दररोज प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे तूर्तास आपण घाईने कोणताही निर्णय घेणार नाही, असे पांडे यांनी सांगितले.
देशातील समभाग (इक्विटी) बाजाराचे प्रमाण आणि त्यातील कामकाजाचा मोठा खर्च लक्षात घेता अहोरात्र व्यवहार सध्या व्यवहार्य नाही, असेही सेबी प्रमुख स्पष्ट म्हणाले.
तुहिनकांत पांडे म्हणाले... डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी (डीएलटी) ही इक्विटी बाजाराचे प्रमाण आणि त्यातील खर्चामुळे हे तंत्रज्ञान इक्विटीपर्यंत विस्तारणे सध्या व्यवहार्य नाही. भांडवली खात्यांसाठी रुपया पूर्ण परिवर्तनीय नसल्यामुळे भारतीय कंपन्यांचे देशात आणि परदेशात असे दुहेरी सूचिबद्ध होणे सध्या शक्य नाही.
दुहेरी सूचिबद्धतेमुळे समभागाची किंमत केवळ समान होईल. याचा उपयोग मात्र सर्व प्रकारचे गुंतवणूकदार सर्व प्रकारच्या ठिकाणी ट्रेडिंग करण्यास सक्षम असले तरच होईल.
सेबी आपल्या इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स (आयसीडीआर), लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स (एलओडीआर) आणि इनोव्हेटर्स ग्रोथ प्लॅटफॉर्म (आयजीपी) नियमांचा सर्वंकष आढावा घेत आहे. मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी (एमटीएफ) आणि प्री-आयपीओ प्लॅटफॉर्मसंबंधी प्रस्तावांचीही तपासणी केली जात आहे.
सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरोइंगबाबत (एसएलबीएम) भारत अपारदर्शक ओव्हर-द-काउंटर पद्धती स्वीकारण्याऐवजी एक्स्चेंज-ट्रेडेड मॉडेलचा पाठपुरावा करेल. यामुळे गुंतवणूकदारांचा फायदा होईल.
ट्रेडिंगचे तास वाढवण्याची एनएसईकडे क्षमता नॅशनल स्टॉक एक्स्चेंजकडे (एनएसई) विविध बाजार विभागांतील व्यवहाराचे तास वाढवण्याची तांत्रिक क्षमता आहे. मात्र, त्यासाठी नियामक मंजुरी आणि बाजार सहभागींची मागणी आवश्यक असेल, असे एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान यांनी सांगितले.
गिफ्ट सिटीतील एनएसई इंटरनॅशनल एक्स्चेंजचा व्यवहार कालावधी 22 तास 30 मिनिटांवरून 23 तास 30 मिनिटे करण्यात आला, त्यामुळे विविध टाइम झोनमधील गुंतवणूकदारांना सेवा देणे शक्य होत असल्याचे चौहान म्हणाले. देशांतर्गत इक्विटी, चलन आणि कमॉडिटी बाजारांचे व्यवहार वेगवेगळ्या वेळापत्रकानुसार सुरू असतात. नियामक चौकट आणि बाजाराची गरज लक्षात घेऊन व्यवहाराचे तास वाढवता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.