म. टा. प्रतिनिधी, नागपूर : पैशाच्या वादातून एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. मारहाणीनंतर युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शुभम (वय ३०) असे मृताचे नाव आहे. तूर्त पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
नोकरीच्या आमिषाने पैसे घेतलेप्राप्त माहितीनुसार, शुभमचे परिसरात दुकान होते. तो ऑनलाइन फॉर्म भरण्याचे काम करीत होता. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याने काही जणांकडून पैसे घेतल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका तरुणीकडूनही नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने ३० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरी न लागल्याने आणि पैसे परत न मिळाल्याने तरुणीने हा प्रकार तिच्या मानलेल्या भावाला सांगितला.
मारहाण करुन फेकलं, दीड तासाने रुग्णालयात नेलंमंगळवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास संबंधित तरुणी, तिची मैत्रीण, मानलेला भाऊ आणि त्याचे साथीदार कारने शुभमच्या दुकानाजवळ पोहोचले. त्यांनी दुकानात घुसून शुभमला मारहाण केली. त्यानंतर त्याला कारमध्ये बसवून नेण्यात आले. कारमध्येही त्याला मारहाण झाल्याची माहिती आहे. या मारहाणीत शुभम बेशुद्ध पडला. यानंतर आरोपींनी त्याला रिंगरोडमार्गे पांजरी टोलनाका परिसरात नेले. तेथे शुभमला कारमधून बाहेर फेकून ते पसार झाले. मात्र, सुमारे दीड तासानंतर घरी परत जात असताना शुभम त्यांना त्याच ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी त्याला पुन्हा कारमध्ये टाकले आणि मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून शुभमला मृत घोषित केले.
मेडिकल पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी याबाबत हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ आणि रुग्णालयातून प्राथमिक माहिती घेतली. शुभमचा मृत्यू नेमका मारहाणीतून झाला की अन्य कारणाने, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती हुडकेश्वर पोलिसांनी दिली.
डॉक्टरांनी मृत घोषित केलंमारहाणीनंतर शुभम बेशुद्ध झाल्याने त्याला कारने पांजरी टोलनाका परिसरात नेण्यात आले. तेथे त्याला कारमधून बाहेर फेकून आरोपी पसार झाले. सुमारे दीड तासानंतर घरी परतताना शुभम त्याच ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसल्याने त्यांनी त्याला पुन्हा कारमध्ये टाकले आणि मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.