पुणे : १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये सहभागी झालेले आणि 'डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ट्रेनिंग' (डीजीएमटी) म्हणून काम केलेले, लष्करातील निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. पुण्याच्या वानवडी परिसरातील साळुंखे विहार येथील त्यांच्या निवासस्थानाच्या गच्चीवरुन पडून त्यांची प्राणज्योत मालवली. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी आणि जावई असा परिवार आहे.
कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "बुधवारी सकाळी अशोक जोशी यांनी त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या व्यक्तीला सांगितले होते, ते थंडी जाणवू लागल्याने ऊन घेण्यासाठी ते गच्चीवर जात आहेत. ते या निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होते."
आवारात पडलेले आढळले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी सांगितले, "काही वेळाने इमारतीतील रहिवाशांना ते आवारात पडलेले दिसले. त्यांनी जोशींकडे घरकाम करणाऱ्या व्यक्तीला याची माहिती दिली, त्याने पुढे जोशींच्या मुलीला कळवले. त्यांची मुलगी तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि त्यांना रुग्णवाहिकेतून 'सदर्न कमांड हॉस्पिटल'मध्ये नेले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले."
चक्कर आल्याचा मुलीला संशयपोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, या घटनेच्या नेमक्या परिस्थितीचा तपास करण्यासाठी त्यांच्या मुलीचा जबाब नोंदवून घेतला आहे. “त्यांच्या मुलीने आम्हाला सांगितले की, त्यांना पूर्वी चक्कर येण्याचा त्रास होत असे आणि ते घरी काही वेळा पडलेही होते. त्यांच्याकडे गेल्या आठ वर्षांपासून काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल कुटुंबाला कोणतीही शंका नाही. आम्ही नियमांनुसार पुढील चौकशी करु” असे खेतमाळस यांनी सांगितले.
अशोक जोशी यांनी 'साळुंखे विहार' गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही अनेक वर्षे काम केले होते. संस्थेच्या प्रशासनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
'बॉम्बे सॅपर्स'चे वरिष्ठ अधिकारी असलेल्या अशोक जोशी यांचे नाव कॉम्बॅट इंजिनिअरिंग, राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी इतिहास क्षेत्रातील योगदानासाठी लष्करी वर्तुळात अत्यंत आदराने घेतले जात असे. लष्करी विषयांवरील त्यांच्या विपुल लेखनासाठीही ते ओळखले जात होते. निवृत्तीनंतरही ते 'बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटर'शी घट्ट जोडलेले होते.
लष्करी विमानतळाचा विकासपूर्व लडाखमधील 'न्योमा'च्या सुरुवातीच्या पाहणीतही अशोक जोशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे ठिकाण पुढे एक धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा लष्करी विमानतळ म्हणून विकसित झाले. १९६१ मध्ये फुकचे येथे तैनात असलेल्या '२० फील्ड कंपनी'मध्ये 'सेकंड-इन-कमांड' म्हणून काम करत असताना, लढाऊ विमानांच्या लँडिंगसाठी न्योमा येथे सुविधा विकसित करण्याच्या उद्देशाने त्यांनी सर्वेक्षणात मोलाची भूमिका बजावली होती. आज न्योमा एअरबेस हा जगातील सर्वाधिक उंचीवरील, लढाऊ विमानांसाठी सक्षम असलेला लष्करी विमानतळ मानला जातो, ज्यामुळे या प्रदेशात त्याला विशेष धोरणात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे.
लष्करी कारकीर्दीव्यतिरिक्त अशोक जोशी यांनी वॉशिंग्टनमध्ये भारताचे 'डिफेन्स अटॅशे' (संरक्षण सहचारी) म्हणूनही काम केले होते.
बॉम्बे सॅपर्सचे एक निवृत्त अधिकारी म्हणाले, “अशोक जोशी यांनी राष्ट्रीय सुरक्षेसोबतच आपल्या समुदायासाठीही मोठे योगदान दिले. त्यांचे निधन ही एक मोठी हानी आहे. ते भारतीय लष्करातील अत्यंत ज्येष्ठ, अनेक पदकांनी सन्मानित आणि अत्यंत आदरणीय अशा दिग्गजांपैकी एक होते.”